काकामिगहारा : भारतीय कुमार संघाने १८ वर्षांखालील आशिया चषक हॉकी स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. भारतीय संघाने तिसर्यांदा ही कामगिरी करताना शनिवारी झालेल्या अंतिम सामन्यात यजमान जपानाचा ४-१ असा पराभव केला. भारतीय मुलींच्या संघाने दक्षिण कोरियाचा ३-० असा पराभव करून कांस्यपदक मिळवले.
मुलांच्या विजयात पुन्हा एकदा आशीष पुर्ती चमकला. त्याने हॅटट्रिक (दुसर्या, २८व्या आणि ३४व्या मिनिटाला) नोंदवली. स्पर्धेत त्याच्या नावावर सर्वाधिक १३ गोल असून, यातील १२ गोल त्याने पेनल्टी कॉर्नर, तर एक गोल पेनल्टी स्ट्रोकवर केला. अंतिम लढतीत भारताचा अन्य एक गोल कर्णधार केतन कुशवाहने ३०व्या मिनिटाला नोंदवला. जपानचा एकमेव गोल नुमाडा गाकू याने ५२व्या मिनिटाला केला.
‘हॉकी इंडिया’ने या कामगिरीबद्दल कुमार संघातील खेळाडूंना प्रत्येकी तीन लाख, तर प्रशिक्षकांसह साहाय्यकांना प्रत्येकी दीड लाख रुपयाचे पारितोषिक जाहीर केले. कांस्यपदक मिळवणार्या भारतीय मुलींच्या संघाला देखील रोख पारितोषिक जाहीर करण्यात आले असून, संघातील प्रत्येक खेळाडूस रोख एक लाख आणि साहाय्यकांस ५० हजार रुपये दिले जातील.
जपानविरुद्धच्या अंतिम लढतीत भारतीय मुलांनी सुरुवातीपासून वर्चस्व राखले. पहिल्या ९० सेकंदातच भारताने पेनल्टी कॉर्नर मिळवला आणि आशीषने तो सत्कारणी लावली. दुसर्या सत्रातही भारतीय मुलांनी जपानवरील दडपण कायम राखले होते. सामन्याच्या २८व्या मिनिटाला मिळालेल्या दुसर्या पेनल्टी कॉर्नरवरही आशीषने गोल केला. त्यानंर प्रल्हाद राजभारच्या पासवर कर्णधार कुशवाहने गोल करून मध्यंतराला भारताला ३-० असे आघाडीवर नेले. तिसर्या सत्रातही भारतीयांचे खेळावरील नियंत्रण कायम होते.
वरिंदर सिंगच्या एका कुशल चालीवर भारताला तिसरा पेनल्टी कॉर्नर मिळाला आणि आशीषने त्यावरही गोल करत भारताची आघाडी भक्कम केली. जपानला अखेर ५२व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी स्ट्रोकने खाते उघडण्याची संधी मिळाली. नुमाडा गाकूने स्ट्रोक यशस्वी मारत गोलफरक कमी करण्याचे समाधान जपानला मिळवून दिले. जपानने अखेरच्या सत्रात कमालीचा वेगवान खेळ करत झटपट तीन पेनल्टी कॉर्नर मिळवले. मात्र, त्यांना भारतीय बचाव भेदता आला नाही.
