भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने सध्या सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीत स्लेजिंग केल्यानंतर त्याने माझ्या मनातील आदर गमावला असल्याचे विधान ऑस्ट्रेलियाचे माजी यष्टीरक्षक इयान हिली यांनी केले. कोहलीने मैदानात ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंबद्दल अनादर बाळगला असून त्याने मैदानात आपला आक्रमकपणा कमी करण्याची गरज आहे. संघर्षाची वृत्ती बाळगल्याने कोहलीच्या संघातील खेळाडूंवरही याचा वाईट परिणाम होत आहे, अशे हिली म्हणाले.

बंगळुरू कसोटीच्या दुसऱया दिवशी विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ यांच्यात खटके उडाले होते. विराट वारंवार स्लेजिंगचा प्रयत्न करत असल्याचे दिसून आले. याशिवाय, कोहलीने रेनशॉवरही वादग्रस्त टीप्पणी केली. याबाबत क्रिकेटविश्वात नाराजी व्यक्त केली जात असून कोहलीला आपल्या वागणुकीत बदल करण्याची गरज असल्याचे सांगितले जात आहे.

 

कोहलीवर दबाव निर्माण झाल्याचे त्याच्या स्लेजिंगच्या प्रकरणावरून स्पष्ट दिसून आले. त्याने आपल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंबद्दल मैदानात आदर बाळगायला हवा. कोहलीने स्मिथसोबत मैदानात केलेला प्रकार नक्कीच स्विकारार्ह नाही, असे हिले यांनी ऑस्ट्रेलियातील एका आकाशवाणीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले.

कोहलीसारखा फलंदाज मी आजवर पाहिला नव्हता. त्याची फिटनेस आणि प्रतिस्पर्धी खेळाडूंना सामोरे जाण्याची त्याची आक्रमक वृत्ती मला याआधी खूप आवडत होती. विशेषत: कोहली कर्णधार नसताना त्याच्या खेळी अफलातून होत्या. पण स्मिथसोबत कोहलीने केलेला प्रकार मला अजिबात आवडला नाही. मैदानात इतक्या घातक स्तरावर जाऊन स्लेजिंग करणे भारतीय संघासाठी धोकादायक आहे. त्यामुळे संघाचा कर्णधार म्हणून खेळाडूंवर तुम्हाला नियंत्रण ठेवणे कठीण होऊन बसते, असेही हिली म्हणाले.