रोहित, राहुलच्या अर्धशतकांमुळे अफगाणिस्तानवर ६६ धावांनी मात

भारतात गल्लोगल्ली दिवाळीचा जल्लोष फटाक्यांच्या आतषबाजीने साजरा होत असतानाच अबू धाबीत फलंदाजांनी केलेल्या आतषबाजीमुळे भारतीय संघाने बुधवारी ट्वेन्टी-२० विश्वचषकात अफगाणिस्तानचा ६६ धावांनी धुव्वा उडवला. रोहित शर्मा (४७ चेंडूत ७४ धावा) आणि के. एल. राहुल (४८ चेंडूत ६९ धावा) या सलामीवीरांनी नोंदवलेल्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने स्पर्धेतील पहिला विजय नोंदवला.

‘अव्वल-१२’ फेरीच्या या सामन्यात भारताने दिलेल्या २११ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तानला २० षटकांत ७ बाद १४४ धावाच करता आल्या. भारताने या विजयासह उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा कायम राखल्या आहेत. मोहम्मद शहजाद (०) आणि हझरतुल्ला झझाई (१३) या अफगाणिस्तानच्या सलामीवीरांना अनुक्रमे मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराने झटपट माघारी पाठवले. तसेच या स्पर्धेतील पहिला सामना खेळणाऱ्या फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने गुल्बदिन नैब (१९) आणि नजीबुल्ला झादरानला (११) बाद केले. करीम जनात (नाबाद ४२) आणि कर्णधार मोहम्मद नबी (३५) यांनी काही चांगले फटके मारले, पण ते विजय मिळवण्यासाठी अपुरे ठरले.

त्याआधी, भारताने प्रथम फलंदाजी करताना २ बाद २१० धावा फटकावल्या. मागील सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर खेळलेल्या रोहितला पुन्हा सलामीला पाठवण्यात आले. त्याने आणि राहुलने आक्रमक शैलीत फलंदाजी करताना १४.४ षटकांत १४० धावांची सलामी दिली. रोहितला ७४ धावांवर बाद करत जनातने ही जोडी फोडली, तर राहुल ६९ धावांवर बाद झाला. अखेरच्या षटकांत हार्दिक पंड्या (१३ चेंडूत नाबाद ३५) आणि ऋषभ पंत (१३ चेंडूत नाबाद २७) यांनी फटकेबाजी करत भारताला दोनशे धावांचा टप्पा ओलांडून दिला.

भारताने या सामन्यात २१० धावांचा डोंगर उभारला. यंदाच्या ट्वेन्टी-२० विश्वचषकातील ही सर्वोच्च धावसंख्या ठरली. तसेच कोणत्याही संघाने २०० धावांचा टप्पा पार केल्याचीही ही पहिलीच वेळ होती.

रोहित शर्मा आणि के. एल. राहुल यांनी या सामन्यात १४० धावांची सलामी दिली. ट्वेन्टी-२० विश्वचषकात कोणत्याही गड्यासाठी ही भारताची सर्वोच्च भागीदारी ठरली.

संक्षिप्त धावफलक

भारत : २० षटकांत २ बाद २१० (रोहित शर्मा ७४, के. एल. राहुल ६९; करीम जनात १/७) विजयी वि. अफगाणिस्तान : २० षटकांत ७ बाद १४४ (करीम जनात नाबाद ४२; मोहम्मद शमी ३/३२, रविचंद्रन अश्विन २/१४)

’  सामनावीर : रोहित शर्मा.