Sunil Gavaskar On Team India: अफगाणिस्तानचा संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये कसोटी एकमेव कसोटी सामन्याची मालिका झाल्यानंतर आता दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांच्या मालिकेला सुरुवात झाली आहे. मालिकेतील पहिला सामना धरमशालेतील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात पावसाने हजेरी लावल्यामुळे हा सामना २५-२५ षटकांचा खेळवण्यात आला होता. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने १९४ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना कर्णधार शुबमन गिलने नाबाद ८४ धावांची खेळी केली आणि भारतीय संघाला विजय मिळवून दिला.

या सामन्यात पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे सामना सुरु होण्यास उशीर झाला. सामना जेव्हा सुरु झाला, त्यावेळी २५-२५ षटकांचा सामना खेळवण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावात फलंदाजी करताना रहमानुल्लाह गुरबाजने १०२ धावांची दमदार खेळी केली. या खेळीच्या बळावर अफगाणिस्तानने १९४ धावांचा डोंगर उभारला. हे आव्हान भारतीय संघाने सहज पूर्ण केले. सामना झाल्यानंतर बोलताना सुनील गावसकर म्हणाले, “धावांचा पाठलाग करताना केएल राहुलने ज्या पद्धतीने फलंदाजी केली, त्यावरुन हेच दिसत आहे की खेळाडू वैयक्तिक रेकॉर्डला बाजूला ठेवून संघाचा विचार करत आहेत.”

सुनील गावसकर म्हणाले की, “जियाउर रहमानने आपले शेवटचे षटक टाकण्याआधी सुरुवातीच्या ३ षटकात अवघ्या १९ धावा खर्च केल्या होत्या. राहुलने त्या षटकात २० धावा खर्च केल्या. त्यावेळी शुबमन गिलला शतक पूर्ण करण्यासाठी २१ धावांची गरज होती. तर संघाला विजयासाठी ३० धावांची गरज होती. असं असताना केएल राहुलने मोर्चा सांभाळला.”

तसेच ते पुढे म्हणाले की, “यावरुन असं दिसून येत आहे की, खेळाडू वैयक्तिक रेकॉर्डला बाजूला ठेवून संघाचा विचार करत आहेत. २३ षटकांत धावांचा पाठलाग करणं, यावरुन तुम्ही अंदाज लावू शकता की भारताने किती चांगल्याप्रकारे आव्हानाचा पाठलाग केला आहे. हे आव्हान मुळीच सोपं नव्हतं, पण या खेळाडूंनी ते आव्हान सोपं बनवलं. कारण खेळाडूंनी संघाला प्रथम प्राधान्य दिलं.” शुबमन गिलकडे शतक पूर्ण करण्याची संधी होती. पण केएल राहुलने सामना लवकरात लवकर संपण्यावर भर दिला. त्यामुळेच सुनील गावसकरांनी भारतीय खेळाडूंचं कौतुक केलं आहे.