India vs Afghanistan 1st ODI Highlights: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील ३ वनडे सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना धरमशालेच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात आधी पावसाने जोरदार बॅटिंग केली. त्यानंतर पहिल्या डावात फलंदाजी करण्यासाठी आलेल्या अफगाणिस्तानकडून रहमानुल्लाह गुरबाजने अवघ्या ४८ चेंडूंचा सामना करुन दमदार शतकी खेळी केली. या खेळीच्या बळावर अफगाणिस्तानने पहिल्या डावात १९४ धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर धावांचा पाठलाग करताना कर्णधार शुबमन गिलची बॅट चांगलीच तळपली. त्याचं शतक थोडक्यात हुकलं. पण शेवटपर्यंत टिकून त्याने भारताला हा सामना ७ गडी राखून जिंकून दिला.
गिलची दमदार खेळी
पावसामुळे हा सामना सुरु होण्यास बराच उशीर झाला होता. त्यामुळे षटकं कमी करण्यात आली. ५:३० ला सामना सुरु झाल्यानंतर प्रत्येकी २५-२५ षटकांचा सामना खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. पहिल्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या अफगाणिस्तानचा डाव अवघ्या १९४ धावांवर आटोपला. भारताला हा सामना जिंकण्यासाठी १९५ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि शुबमन गिलची जोडी मैदानावर आली. या जोडीने पहिल्या विकेटसाठी ४६ धावा जोडल्या.
रोहित अवघ्या १६ धावांवर धावबाद होऊन माघारी परतला. त्यानंतर त्यानंतर इशान किशनने ३४ धावांचे योगदान दिले.टी-२० संघाचा कर्णधार बनलेला श्रेयस अय्यर वनडे पदार्पणात फ्लॉप ठरला. त्याने १५ चेंडूत अवघ्या १२ धावा केल्या. त्यांनंतर केएल राहुल आणि शुबमन गिलने मिळून सामना संपवला. गिल ८४ धावांवर नाबाद राहिला. तर केएल राहुल ३९ धावांवर नाबाद राहिला. भारताने हा सामना ७ गडी राखून जिंकला. यासह मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे.
अफगाणिस्तानने केल्या १९४ धावा
या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या अफगाणिस्तानचा डाव १९४ धावांवर आटोपला.पण अफगाणिस्तानला हवी तशी सुरुवात करता आली नव्हती. इब्राहिम जादरान १, तर सेदिकुल्लाह अटल ० तर रहमत शाह अवघ्या ३ धावा करुन माघारी परतला. कर्णधार हसमतुल्लाह शाहिदीने २७ धावांचे योगदान दिले. सलामीला आलेल्या रमहमानु्ल्लाह गुरबाजने ५१ चेंडूंचा सामना करत १०२ धावांची खेळी केली. अफगाणिस्तानला सुरुवातीला मोठे धक्के बसले होते. पण त्यानंतर रहमानुल्लाह गुरबाजच्या शतकी खेळीच्या बळावर अफगाणिस्तानने दमदार पुनरागमन केलं. पण तो बाद झाल्यानंतर अफगाणिस्तानला हवा तसा शेवट करता आला नाही. अफगाणिस्तानचा संपूर्ण डाव २४.५ षटकात १९४ धावांवर आटोपला.
