DDCA On India vs Afghainstan 1st T20I: भारत आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांमध्ये होणाऱ्या टी-२० मालिकेला अवघे ३ दिवस शिल्लक राहिले आहेत. या मालिकेतील पहिला सामना १३ सप्टेंबरला दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. पण ही मालिका सुरू होण्याआधीच मोठी बातमी समोर येत आहे. ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान दरम्यान दिल्लीत ब्रिक्स परिषद पार पडणार आहे. या परिषदेमुळे भारत आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांमध्ये होणाऱ्या मालिकेच्या वेळापत्रकात बदल होऊ शकतो अशी चर्चा रंगली होती. यावर आता दिल्ली क्रिकेट असोसिएशनने स्पष्टीकरण देत, भारत- अफगाणिस्तान टी-२० मालिकेतील पहिला सामना ठरलेल्या वेळापत्रकानुसार होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.
भारत आणि अफगाणसितान या दोन्ही संघांमध्ये होणाऱ्या मालिकेतील पहिला सामना १३ सप्टेंबरला खेळवला जाणार आहे. तर मालिकेतील दुसरा सामना १५ सप्टेंबरला आणि तिसरा सामना १७ सप्टेंबरला खेळवला जाणार आहे. या मालिकेतील तिन्ही सामने अरुण जेटली स्टेडियमवर खेळवले जाणार आहे. या मालिकेचं वेळापत्रक २ महिन्याआधीच जाहीर करण्यात आलं होतं. तर दिल्लीत होणारी ब्रिक्स परिषद ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान पार पडणार आहे. या परिषदेसाठी देशभरातून आणि परदेशातूनही अनेक लीडर्स उपस्थित राहणार आहेत. तसेच भारत आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांमध्ये होणारा सामना देखील सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाचा आहे. हा सामना पाहण्यासाठी २० ते ३० हजार प्रेक्षक हजेरी लावण्याची शक्यता आहे.
दिल्ली क्रिकेट असोसिएशनने पोस्ट शेअर करत दिली माहिती…
दिल्ली क्रिकेट असोसिएशनने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट शेअर करून भारत- अफगाणिस्तान यांच्यातील पहिल्या टी-२० सामन्याबाबत अपडेट दिली आहे. DDCA ने आपल्या पोस्टमध्ये लिहिले, “भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील पहिला टी-२० सामना १३ सप्टेंबरला अरूण जेटली स्टेडियमवर नियोजित वेळापत्रकानुसारच होणार आहे. दिल्ली वाहतूक पोलिसांसोबत झालेल्या बैठकीनंतर डीडीसीएला आवश्यक असलेले सर्व सहकार्य आणि व्यवस्था करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.”
यादरम्यान अशी माहिती समोर आली होती की, दिल्लीतील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी डीडीसीएच्या अधिकाऱ्यांना पत्र लिहून पहिला टी-२० सामना १३ सप्टेंबरऐवजी पुढे ढकलण्यात यावा, अशी विनंती केली होती. १३ सप्टेंबरला ब्रिक्स परिषद असल्याने ट्रॅफिक वळवण्यात येणार आहे. या सामन्यादरम्यान २० ते २५ हजार प्रेक्षक येणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पण आता डीडीसीएने स्पष्ट केलं आहे की, हा सामना नियोजित वेळेतच खेळवला जाणार आहे. त्यामुळे पहिला सामना १३ सप्टेंबरला संध्याकाळी ७ वाजता सुरू होणार आहे.
