India vs Afghanistan Highlights: भारत आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसरा सामना लखनौच्या एकाना स्टेडियममध्ये पार पडला. या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना शुबमन गिलने १५४, तर इशान किशनने १२५ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर भारतीय संघाने ४०२ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचा डाव अवघ्या २३२ धावांवर आटोपला. यासह भारतीय संघाने हा सामना १७० धावांनी जिंकून मोठ्या विजयाची नोंद केली आहे. यासह या मालिकेत २-० ने विजयी आघाडी घेतली आहे.
या सामन्यात अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाला सुरुवातीलाच मोठा धक्का बसला. सलामीला आलेला यशस्वी जैस्वाल अवघ्या ४ धावांवर माघारी परतला. त्यानंतर रोहित शर्मा आणि शुबमन गिलने मिळून संघाचा डाव सावरला. दोघांनी महत्वपूर्ण भागीदारी केली. रोहित ४८ धावांवर बाद झाला. त्यानंतर शुबमन गिल आणि इशान किशनने मिळून अफगाणिस्तानच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. दोघांनी मिळून २०० हून अधिक धावांची भागीदारी केली. गिलने १५४ तर इशान किशनने १२५ धावांची खेळी केली. तर श्रेयस अय्यरने २६ धावा केल्या. वॉशिंग्टन सुंदरने १९ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर भारतीय संघाने ४०२ धावांपर्यंत मजल मारली.
अफगाणिस्तानला हा सामना जिंकण्यासाठी ४०३ धावांचा डोंगर सर करायचा होता. या धावांचा पाठलाग करताना रहमानुल्लाह गुरबाजने ४१ धावांची सलामी दिली. तर इब्राहिम जादरानने २१ धावा केल्या. त्यानंतर सेदिकुल्लाह अटलने ४२ धावांची खेळी केली. अफगाणिस्तानकडून रहमत शाहने सर्वाधिक ७९ धावांची खेळी केली. पण अफगाणिस्तानचा डाव २३२ धावांवर आटोपला.
या धावांचा बचाव करताना भारतीय संघाकडून अर्शदीप सिंगने ४५ धावा खर्च करुन ३ गडी बाद केले. तर गुरनूर ब्रारने ६० धावा खर्च करुन ३ गडी बाद केले. आपला पहिलाच सामना खेळत असलेल्या प्रिन्स यादवने ५६ धावा खर्च करुन २ गडी बाद केले. तर वॉशिंग्टन सुंदरने १ गडी बाद केला. भारतीय संघाने हा सामना १७० धावांनी जिंकून मालिकेत २-० ने विजयी आघाडी घेतली आहे.
