India vs Afghanistan ODI Series: आयपीएल संपल्यानंतर आता भारतीय संघ अफगाणिस्तानचा सामना करण्यासाठी सज्ज झाला आहे. भारत आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांमध्ये १ कसोटी सामना आणि ३ वनडे सामन्यांची मालिका रंगणार आहे. या दोन्ही मालिकांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय खेळाडूंनी कसोटी मालिकेची जोरदार तयारी सुरु केली आहे. वनडे मालिकेसाठी रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्या या दोघांनाही भारतीय संघात स्थान देण्यात आलं आहे. पण दोघेही पूर्णपणे फिट नसल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे बीसीसीआयने दोघांनाही रिहॅबसाठी बंगळुरुतील सेंटर ऑफ एक्सिलेंसमध्ये जाण्यास सांगितलं आहे. हार्दिक पंड्या तर बंगळुरुत पोहोचला आहे, पण रोहित शर्माबाबत अजूनपर्यंत कुठलीही अपडेट समोर आलेली नाही.
आयपीएल २०२६ स्पर्धेदरम्यान हार्दिक पंड्याच्या पाठीला दुखापत झाली होती. त्यामुळे तो काही सामने खेळू शकला नव्हता. त्याचा वनडे मालिकेसाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. पण त्याच्या नावासमोर फुली होती, म्हणजे तो जर फिट असेल तरच त्याला खेळण्याची संधी दिली जाईल. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, हार्दिक पंड्या २ जूनला बंगळुरुत दाखल होणार होता. इथे १ आठवडा फिटनेसवर मेहनत घेतल्यानंतर तो भारतीय संघासोबत जोडला जाणार होता.
तर रोहित शर्माला देखील हॅमस्ट्रिंगच्या दुखण्यामुळे काही सामने खेळता आले नव्हते. त्याने शेवटच्या काही सामन्यांमध्ये पुनरागमन केलं. बीसीसीआयने त्याला भारतीय संघात स्थान तर दिलं आहे, पण त्याच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह असल्याचं म्हटलं आहे. पण मुंबई इंडियन्सचा मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धनेने स्पष्ट केलं होतं की, रोहित १०० टक्के फिट आहे.
बीसीसीआयच्या मेडिकल टीमने आधीच रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्या या दोघांनाही सांगितलं होतं की, जर संघात खेळायचं असेल तर फिटनेस सिद्ध करावा लागेल. दोघेही आयपीएल स्पर्धेदरम्यान दुखापतग्रस्त झाले होते. त्यामुळे दोघांनाही एक आठवडा आपल्या फिटनेसवर मेहनत घ्यावी लागणार आहे. जर रोहित आणि हार्दिकला ही मालिका खेळायची असेल, तर दोघांनाही आपली फिटनेस सिद्ध करावी लागेल. पण जर असं झालं नाही, तर दोघांनाही संघात स्थान मिळणं कठीण आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील वनडे मालिकेला १३ जूनपासून सुरुवात होणार आहे. मालिकेतील पहिला सामना १३ जूनला, दुसरा सामना १७ जूनला आणि तिसरा सामना २० जूनला खेळवला जाणार आहे.
