अफगाणिस्तानविरुद्धच्या आगामी एक कसोटी आणि तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघाची आज, मंगळवारी घोषणा केली जाणार असून अनुभवी सलामीवीर रोहित शर्माची निवड तंदुरुस्तीवर अवलंबून असेल असे समजते. तसेच जसप्रीत बुमराच्या कार्यभार व्यवस्थापनावरही विशेष लक्ष दिले जाणार आहे. त्यामुळे त्याला कसोटी आणि एकदिवसीयपैकी कोणत्या मालिकेत विश्रांती दिली जाते याकडेही चाहत्यांचे लक्ष असेल.
‘आयपीएल’चा यंदाचा हंगाम ३१ मे रोजी संपणार असून त्यानंतर आठवडाभरातच मुल्लानपूर (न्यू चंडीगड) येथे एकमेव कसोटी सामना (६-१० जून) खेळवला जाणार आहे. त्यामुळे कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात निवड झालेल्या खेळाडूंना विश्रांतीसाठी फारसा वेळ मिळणार नाही. त्यानंतर तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला १४ जूनपासून सुरुवात होईल.
माजी कर्णधार रोहित शर्मा आता कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाला असला, तरी तो एकदिवसीय सामने खेळतो. अफगाणिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी त्याची निवड निश्चित नाही. सध्या सुरू असलेल्या ‘आयपीएल’ स्पर्धेत रोहितला पायाच्या दुखापतीमुळे मुंबई इंडियन्स संघाच्या काही सामन्यांना मुकावे लागले होते. त्याने आता पुनरागमन केले असले, तरी तो प्रभावी खेळाडू (इम्पॅक्ट प्लेयर) म्हणून केवळ फलंदाजीसाठी मैदानात उतरत आहे.
त्यामुळे तो पूर्णपणे तंदुरुस्त आहे आणि एकदिवसीय सामन्यात संपूर्ण १०० षटके मैदानात राहू शकेल याची निवड समितीला खात्री असेल, तरच त्याला संघात स्थान मिळणार असल्याचे समजते. रोहितप्रमाणेच विराट कोहलीही आंतरराष्ट्रीय स्तरावर आता केवळ एकदिवसीय सामने खेळतो. यंदाच्या ‘आयपीएल’मध्ये त्याने फलंदाजीत शानदार कामगिरी केली आहे. त्यामुळे तो अफगाणिस्तानविरुद्ध तीनही एकदिवसीय सामने खेळणे अपेक्षित आहे.
पडिक्कल तिसर्या क्रमांकावर अफगाणिस्तानविरुद्धचा कसोटी सामना भारताच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.
भारताला मायदेशातील गेल्या तीनपैकी दोन कसोटी मालिकांत हार पत्करावी लागली आहे. भारतीय फलंदाजांना प्रतिस्पर्धी संघातील फिरकीपटूंनी अडचणीत टाकले होते. त्यातच चेतेश्वर पुजारा संघाबाहेर झाल्यापासून भारताला तिसर्या क्रमांकासाठी भरवशाचा फलंदाज मिळालेला नाही. साई सुदर्शनला संधी मिळाली, पण त्याने निराशा केली. त्यामुळे आता या क्रमांकासाठी देवदत्त पडिक्कलला पसंती मिळू शकते. पडिक्कलने देशांतर्गत स्पर्धा आणि ‘आयपीएल’मध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. अन्य मोठे बदल अपेक्षित नाहीत.
बुमराबाबत चर्चा ’तारांकित वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराची तंदुरुस्ती हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. गेल्या काही काळात तो सातत्याने क्रिकेट खेळत आहे. ट्वेन्टी-२० विश्वचषकानंतर तो थेट ‘आयपीएल’मध्ये दाखल झाला. यंदाच्या हंगामात त्याने मुंबई इंडियन्सकडून आतापर्यंतचे सर्व सामने खेळले आहेत. ’आता राष्ट्रीय निवड समितीकडून त्याच्या कार्यभार व्यवस्थापनाकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे. त्याला अफगाणिस्तानविरुद्ध कसोटी सामना किंवा एकदिवसीय मालिका यापैकी एकातच खेळवले जाणार असल्याचे समजते.
’एकदिवसीय विश्वचषकाला (ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२७) अजून बराच कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे बुमराला एकदिवसीय सामने खेळवण्याची घाई केली जाणार नाही. तसेच अष्टपैलू हार्दिक पंड्याची निवडही तंदुरुस्तीवरच अवलंबून असेल.
नव्या चेहर्यांना संधी?
कसोटी संघात जम्मू-काश्मीरचा वेगवान गोलंदाज अकीब नबी, तर एकदिवसीय संघात दिल्लीचा वेगवान गोलंदाज प्रिन्स यादवला संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बुमराला कोणत्या मालिकेत विश्रांती दिली जाते यावर या दोघांची निवड अवलंबून आहे. हर्षित राणा उपलब्ध नसल्याने एकदिवसीय संघात प्रिन्सला स्थान मिळण्याची शक्यता अधिक आहे.
