India vs Afghanistan T20 Series ACB video features complete Indian map: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात तीन सामन्यांची टी-२० मालिका भारतात खेळवली जाणार आहे. अफगाणिस्तान संघाकडे या मालिकेसाठी यजमानपद असणार आहे आणि हे सर्व सामने दिल्लीत खेळवले जातील. म्हणजेच टीम इंडिया आपल्या घरच्याच मैदानावर पाहुणा संघ म्हणून खेळणार आहे. यादरम्यान अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो चर्चेचा विषय ठरला आहे.
बीसीसीआयने शेअर केलेला हा व्हिडिओ दोन्ही संघांमधील मालिकेची झलक (टीझर) आहे. दोन संघांमधील या स्पर्धेदरम्यानच्या मैत्रीची एक झलक या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. मात्र, १ मिनिट १५ सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये असा एक क्षण आहे ज्यामुळे शेजारील देश पाकिस्तानचा संताप संताप होणार आहे. अफगाणिस्तान बोर्डाने शेअर केलेला हा व्हिडिओ भारतीय चाहते शेअर करताना दिसत आहेत. तर या व्हिडिओवर कमेंट्सचा पाऊस पडत आहे.
व्हिडिओच्या साधारण ४० व्या सेकंदाला एक ॲनिमेटेड पृथ्वीगोल दिसतो, ज्यामध्ये भारत आणि अफगाणिस्तानचे नकाशे अधोरेखित केले आहेत. सर्वात आधी अफगाणिस्तानचा व नंतर भारताचा नकाशा या पृथ्वीगोलावर दाखवण्यात आला. पण या नकाशाने चाहत्यांचं विशेष लक्ष वेधून घेतलं. यामागचं कारण म्हणजे संपूर्ण काश्मीर हा भारताचा भाग म्हणून दर्शवण्यात आला आहे; अगदी पाकिस्तानच्या प्रशासनाखालील काश्मीरचा भागही भारताचाच भाग असल्याचं यात दाखवलं आहे. याच कारणामुळे एसीबीचा (ACB) हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात काश्मीरवरून अनेक दशकांपासून संघर्ष सुरू आहे. १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, पाकिस्तानने काश्मीरचा काही भाग बळकावला; हा भाग ‘पाकिस्तान-व्याप्त काश्मीर’ (PoK) म्हणून ओळखला जातो. दरम्यान, काश्मीरचा उर्वरित भाग हा भारताचा अविभाज्य भाग आहे, तरीही संपूर्ण प्रदेश आपलाच असल्याचा दावा पाकिस्तान सातत्याने करत असतो. अफगाणिस्तान हा भारत आणि पाकिस्तानचा शेजारी देश आहे. अफगाणिस्तान देशाला क्रिकेटसाठी भारतीय संघाने वर्षानुवर्षे बरीच मदत केली आहे.
भारतीय क्रिकेट संघ अफगाणिस्तानविरुद्ध तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळणार असून, या मालिकेचे यजमानपद अफगाणिस्तानकडे असेल. हे सर्व सामने दिल्लीतील अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर खेळवले जातील. मालिकेतील पहिला सामना रविवारी १३ सप्टेंबरला होणार आहे. दुसरा सामना १५ सप्टेंबरला, तर तिसरा आणि अंतिम सामना १७ सप्टेंबरला खेळवला जाईल. हे सामने संध्याकाळी खेळवले जाणार आहेत.
