वृत्तसंस्था, नवी दिल्ली : विश्वविजेता भारतीय ट्वेन्टी-२० संघ मायदेशातच पाहुणा म्हणून खेळणार आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात सप्टेंबरमध्ये तीन सामन्यांच्या ट्वेन्टी-२० मालिकेचे आयोजन करण्यात येणार आहे. मालिकेचे यजमानपद अफगाणिस्तानकडे असले, तरी सामने नवी दिल्ली येथे होतील. ‘बीसीसीआय’ व अफगाणिस्तान क्रिकेट मंडळाने संयुक्त निवेदनाद्वारे या मालिकेची घोषणा केली. त्यामुळे त्याच महिन्यात अपेक्षित असलेल्या बांगलादेशविरुद्धच्या मालिकेबाबत संदिग्धता निर्माण झाली आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील ही द्विपक्षीय मालिका गेल्या वर्षी बांगलादेशातील राजकीय अशांततेमुळे पुढे ढकलावी लागली होती. तेव्हापासून या मालिकेला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही.

अफगाणिस्तानातील अस्थिर राजकीय परिस्थितीमुळे अफगाणिस्तान क्रिकेट मंडळाने गेल्या काही वर्षांत आपले सामने भारतात आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ही मालिका नवी दिल्ली येथील अरुण जेटली मैदानावर खेळवण्यात येईल. या मालिकेची सुरुवात १३ सप्टेंबर रोजी होईल, तर दुसरा सामना १५ सप्टेंबरला आणि तिसरा सामना १७ सप्टेंबरला खेळवला जाईल.

अफगाणिस्तानने नुकताच जूनमध्ये तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारताचा दौरा केला होता, तसेच जानेवारी २०२४ मध्ये या दोन्ही संघांमध्ये तीन ट्वेन्टी-२० सामन्यांची मालिका खेळवली गेली होती. भारताने २०१८ मध्ये अफगाणिस्तानच्या ऐतिहासिक पहिल्या कसोटी सामन्याचे यजमानपद भूषवले होते आणि तेव्हापासून दोन्ही संघ सर्व स्वरूपांमध्ये नियमितपणे एकमेकांविरुद्ध खेळत आहेत.

अफगाणिस्तानमधील क्रिकेटच्या वाढीला पाठिंबा देण्यासाठी आणि त्यांच्या खेळाडूंना उच्च पातळीवर स्पर्धा करण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी ‘बीसीसीआय’ कटिबद्ध असल्याचे अध्यक्ष मिथुन मन्हास म्हणाले, तर सचिव देवजित सैकिया यांनी अफगाणिस्तानचे खेळाडू भारतातील चाहत्यांमध्येही खूप लोकप्रिय आहेत आणि दोन क्रिकेट देशांमध्ये निर्माण झालेल्या मजबूत बंधाचे हे प्रतिबिंब असल्याचे सांगितले.