वृत्तसंस्था, चेन्नई
कनिष्ठ गटाच्या पुरुष विश्वचषक हॉकी स्पर्धेत विजेतेपदाची लढत खेळण्याचे स्वप्न भंगले असले, तरी यजमान भारतीय संघ सरतेशेवटी विजयमंचावर येण्याची आस बाळगून आहे. स्पर्धेतील तिसऱ्या क्रमांकासाठी आज, बुधवारी भारताची अर्जेंटिनाशी लढत होईल.
भारतीय संघाने नऊ वर्षांपूर्वी घरच्याच मैदानावर लखनऊ येथे विजेतेपद मिळविले होते. यंदा या कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचे भारतीय संघाचे ध्येय होते. मात्र, उपांत्य फेरीत गतविजेत्या जर्मनीकडून पराभवाचा सामना करावा लागल्याने त्यांच्या जेतेपदाच्या आशा संपुष्टात आल्या.
आता भारतीय संघ घरच्या मैदानावर किमान विजयमंचावर येण्यासाठी प्रयत्न करेल. यासाठी भारतीय संघाला जर्मनीविरुद्ध झालेल्या सामन्यातील चुका सुधारून अर्जेंटिनाविरुद्ध आत्मविश्वासाने मैदानावर उतरावे लागेल. यापूर्वी दोन वेळा विजेता राहिलेला अर्जेंटिना संघही स्पेनविरुद्धच्या पराभवाने दुखावला गेला आहे. त्यामुळे तेसुद्धा हा सामना जिंकून विजयमंचावर येण्यासाठी प्रयत्नशील राहतील.
जर्मनीविरुद्ध भारतीय बचाव फळी कमालीच्या दडपणाखाली खेळली. दिलराज सिंग, अर्शदीप सिंग, सौरभ कुशावह, गुरजोत सिंग आणि अजित यादव यांनी जर्मनीविरुद्ध गोल करण्याच्या अनेक संधी निर्माण केल्या. मात्र, त्या यशस्वी करण्यासाठी त्यांना जर्मनीच्या बचाव फळीला चकवण्यात अपयश आले. ‘‘नियोजनानुसार खेळण्यात आलेले अपयश आणि त्यातून झालेल्या चुकांमुळे भारताला जर्मनीविरुद्ध पराभव पत्करावा लागला,’’ अशी कबुली भारताचे प्रशिक्षक पी. आर. श्रीजेश यांनी दिली आहे.
‘‘सामन्यात जिंकणे आणि हरणे हे आलेच. तुम्ही किती गोलच्या फरकाने पराभूत झालात याला महत्त्व नसते. पराभवातही तुम्ही गोल कसे स्वीकारता याला महत्त्व आहे आणि हीच आमच्यासाठी मोठी समस्या आहे. आधी याकडे लक्ष केंद्रित करावे लागेल. प्रथम चांगला बचाव, नंतर आक्रमण आणि मग गोल करण्याच्या संधी निर्माण करणे असा खेळ अपेक्षित आहे. आम्ही संधी साधण्यात कमी पडत आहोत,’’ असेही श्रीजेश म्हणाले. यासाठी रोशन खुजुर, अंकित पाल, मनमीत सिंग अद्रोहित एक्का आणि थौना ओजाम इंगालेम्बा लुवांग या खेळाडूंना आक्रमकांसाठी संधी निर्माण करण्यासाठी अधिक सक्रिय राहावे लागेल. पेनल्टी कॉर्नर यशस्वी करणे ही भारताची समस्या कायम आहे. कर्णधार रोहितला यामध्ये आलेले अपयश विसरता येणार नाही. गोलरक्षक प्रिन्सदीप सिंग याची कामगिरी चांगली झाली आहे. त्याचे सातत्य भारतासाठी महत्त्वाचे ठरेल. दरम्यान, जर्मनी आठव्या विजेतेपदासाठी स्पेनशी दोन हात करेल.
