अॅडलेड कसोटीच्या दुसऱया दिवशी मायकेल क्लार्क आणि स्टीव्हन स्मिथ यांनी शतक साजरे करून टीम इंडियासमोर भक्कम धावसंख्या उभारली. पाठिच्या दुखण्याने उचल खाल्ल्यामुळे ६० धावांवर मैदान सोडावे लागलेल्या मायकेल क्लार्क दुसऱया दिवशी पुनरागमन करत दमदार फलंदाजी केली. आणि आपले शतक गाठले. तर, पहिल्या दिवसापासून आक्रमक फटकेबाजी करत असलेल्या स्टीव्हन स्मिथने दुसऱया दिवशी आक्रमक पण तितकीच संयमी खेळी करत नाबाद १६२ धावा ठोकल्या आहेत. दुसऱया दिवसाचा खेळ संपल्यावर ऑस्ट्रेलियाची धावसंख्या ७ बाद ५१७ अशी झाली आहे. दुसरा संपूर्ण दिवस क्लार्क आणि स्मिथच्या फलंदाजी कौशल्याने व्यापून गेला. या दोघांसमोर भारतीय गोलंदाजी पूर्णपणे निष्प्रभ ठरताना दिसली. दिवसाच्या अखेरच्या षटकात कर्ण शर्माच्या फिरकी गोलंदाजीवर क्लार्क १२८ धावांवर झेलबाद झाला हे एकच यश भारताच्या पदरात पडले.