ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज मॅट रेनशॉने भारत दौऱयात चांगली कामगिरी करून आपली योग्यता सिद्ध करून दाखवली. भारतीय संघाचा डाव १८९ धावांत संपुष्टात आला होता. प्रत्युत्तरात रेनशॉ काही बाद होण्यास तयार नव्हता. प्रचंड इच्छाशक्ती बाळगून रेनशॉ मैदानात टीच्चून फलंदाजी करत होता. अशावेळी भारतीय कर्णधार विराट कोहलीने मैदानात स्लेजिंगने ऑस्ट्रेलियन फलंदाजांची एकाग्रता भंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, रेनशॉने कोहलीच्या स्लेजिंगचाही यशस्वीपणे सामना केला.
बंगळुरू कसोटीच्या दुसऱया दिवशी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथसोबतच्या शाब्दीक चकमकीनंतर कोहलीने आपला मोर्चा रेनशॉकडे वळवला. विराटने रेनशॉला पुण्यातील कसोटीत घेतलेला ‘टॉयलेट ब्रेक’ची आठवण करून दिली. पण कोहलीच्या या कृत्यावर कोणतीही प्रतिक्रिया न देता रेनशॉने केवळ स्मितहास्य करून आपल्या खेळावर लक्ष केंद्रीत केले.
दुसऱया दिवसाचा खेळ संपुष्टात आल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत रेनशॉने मैदानात कोहलीसोबत झालेल्या संभाषणाची माहिती दिली. मैदानावर घडलेल्या प्रसंगाचा मी पूर्ण आनंद घेत होतो. विराटकडून केल्या जाणाऱया कृत्यावर मला हसू येत होते. पुण्यातील कसोटीत मी टॉयलेट-ब्रेक घेतला होता. त्याचीच विराट मला वारंवार आठवण करून देत होता, असे रेनशॉने सांगितले.
दरम्यान, मॅट रेनशॉ आणि शॉन मार्श यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाच्या संघाला दुसऱया दिवसाच्या अखेरीस भारतावर ४८ धावांची आघाडी घेता आली होती. ऑस्ट्रेलियाने दुसऱया दिवसाच्या अखेरीस ६ बाद २३७ धावांपर्यंत मजल मारली होती. मात्र, कसोटीच्या तिसऱया दिवशी भारताकडून रविंद्र जडेजाने आपल्या अफलातून फिरकीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाला २७६ धावांवर रोखले. जडेजाने एकूण सहा विकेट्स घेतल्या.