इंदूर : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा एकदिवसीय क्रिकेट सामना आज, रविवारी इंदूर येथे खेळवला जाणार असून फलंदाज श्रेयस अय्यरचा यात लय मिळवण्याचा प्रयत्न असेल. मोहाली येथील सपाट खेळपट्टीवर श्रेयस केवळ तीन धावांवर धावचीत झाला. त्यामुळे त्याच्यावर कामगिरी उंचावण्यासाठी दडपण आहे.
पहिल्या सामन्यात मोहम्मद शमी आणि सूर्यकुमार यादव यांची कामगिरी ही भारतासाठी सकारात्मक बाब होती. मात्र, भारताला श्रेयस अय्यरच्या कामगिरीबाबत चिंता असेल. आगामी विश्वचषकासाठी चौथ्या क्रमांकावरील फलंदाज म्हणून श्रेयसकडे पाहिले जात आहे. मात्र, गेल्या काही काळात पाठीच्या दुखापतीमुळे श्रेयसला फारसे सामने खेळता आलेले नाही. श्रेयसला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याची संधी मिळाली. मात्र, त्याला केवळ आठ चेंडू खेळता आले. त्यामुळे अंतिम ११ खेळाडूंमधील आपले स्थान निश्चित करण्यासाठी श्रेयसला मोठी खेळी करण्याची आवश्यकता आहे. इंदूर येथील फलंदाजीला अनुकूल खेळपट्टी श्रेयससाठी फायदेशीर ठरू शकेल.




हेही वाचा >>> पुणेकरांना वर्ल्डकप ट्रॉफी जवळून पाहण्याची संधी मिळणार; ‘या’ दिवशी भव्य रॅलीचं आयोजन
अश्विन, शार्दूलवर नजर
शार्दूल ठाकूरला आपल्या कामगिरीत सुधारणा करावी लागणार आहे. केवळ गोलंदाजीच्या बाबतीत बुमरा, सिराज आणि शमी हे शार्दूलपेक्षा सरस असले, तरी फलंदाजी करण्याची क्षमता शार्दूलसाठी फायदेशीर ठरते आहे. त्यामुळेच त्याचे भारतीय संघातील स्थान कायम आहे. शार्दूलने पहिल्या सामन्यात १० षटकांत ७८ धावा खर्ची केल्या. त्याची बळींची पाटी कोरी राहिली. इंदूर येथे गोलंदाजी करणे अवघड असून शार्दूलची पुन्हा कसोटी लागणार आहे. तसेच अनुभवी ऑफ-स्पिनर रविचंद्रन अश्विनवरही पुन्हा सर्वाचे लक्ष असेल.
* वेळ : दु. १.३० वा. * थेट प्रक्षेपण : स्पोर्ट्स १८-१, जिओ सिनेमा