ऑस्ट्रेलियावर सहा गडी राखून मात; रोहित चमकला

नागपूर : कर्णधार रोहित शर्माच्या (२० चेंडूंत नाबाद ४६ धावा) आक्रमक खेळीच्या बळावर भारताने शुक्रवारी दुसऱ्या ट्वेन्टी-२० क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियावर सहा गडी राखून मात केली. नागपूर येथे झालेल्या या सामन्यातील विजयासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे.   

पाऊस आणि त्यानंतर मैदानातील काही भाग ओला असल्याने सामना सुरू होण्यासाठी विलंब झाला. अखेर हा सामना आठ-आठ षटकांचा करण्यात आला. भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचे आमंत्रण दिल्यानंतर ऑस्ट्रेलियाने ५ बाद ९० अशी धावसंख्या उभारली. कर्णधार आरोन फिंच (१५ चेंडूंत ३१) आणि मॅथ्यू वेड (२० चेंडूंत नाबाद ४३) यांनी फटकेबाजी केली.

ऑस्ट्रेलियाने दिलेले ९१ धावांचे लक्ष्य भारताने ७.२ षटकांत चार गडय़ांच्या मोबदल्यात गाठले. रोहितने नाबाद ४६ धावांच्या खेळीत चार चौकार आणि चार षटकारांची आतषबाजी केली. अ‍ॅडम झ्ॉम्पाच्या फिरकीपुढे भारताची मधली फळी ढेपाळली. मात्र, अखेरच्या षटकात नऊ धावांची आवश्यकता असताना दिनेश कार्तिकने एक षटकार आणि एक चौकार मारत भारताला विजय मिळवून दिला.

संक्षिप्त धावफलक

ऑस्ट्रेलिया : ८ षटकांत ५ बाद ९० (मॅथ्यू वेड नाबाद ४३, आरोन फिंच ३१; अक्षर पटेल २/१३) पराभूत वि. भारत : ७.२ षटकांत ४ बाद ९२ (रोहित शर्मा नाबाद ४६; अ‍ॅडम झॅम्पा ३/१६)