Mohammad Shami tested positive for Covid-19 : २० सप्टेंबरपासून मोहाली येथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाची तीन सामन्यांची टी-२० मालिका सुरू होणार आहे. ही मालिका सुरू होण्यापूर्वी भारतीय संघातून एक महत्त्वाचा खेळाडू बाहेर झाला आहे. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याला करोना विषाणूचा संसर्ग झाल्याने तो आगामी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेत खेळू शकणार नाही. मागील अनेक दिवसांपासून तो संघाबाहेर होता. पण आता करोना संसर्ग झाल्याने त्याचं पुनरागमन पुन्हा एकदा लांबणीवर पडलं आहे.

मोहम्मद शमीच्या जागी आता भारताचा अनुभवी वेगवान गोलदांज उमेश यादवला संघात संधी मिळणार आहे. उमेश यादवही दोन वर्षानंतर संघात पुनरागमन करणार आहे. यापूर्वी २०१९ मध्ये उमेश यादव ऑस्ट्रेलियाविरुद्ध सात टी-२० सामन्यांच्या मालिकेत खेळला होता. दरम्यान, त्याला दुखापत झाल्याने मागील दोन वर्षापासून तो संघाबाहेर होता. अखेर दोन वर्षानंतर उमेश यादव पुनरागमन करणार आहे.

हेही वाचा- दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धा : पश्चिम विभागाची पकड मजबूत; ५०१ धावांचा पाठलाग करताना मध्य विभाग २ बाद ३३

याबाबतची अधिक माहिती देताना बीसीसीआयच्या एका वरिष्ठ सूत्राने ‘पीटीआय’ वृत्तसंस्थेला सांगितलं की, होय, मोहम्मद शमीची कोविड-१९ ची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. पण करोना संसर्गाची लक्षणं सौम्य असल्याने काळजी करण्यासारखे काही नाही. मात्र, करोना संसर्गामुळे त्याला विलगीकरणात राहावं लागणार आहे. त्याची करोना चाचणी निगेटिव्ह आल्यावर तो पुन्हा संघात पुनरागमन करू शकेल.

हेही वाचा- रविवार विशेष : त्याच चुका पुन:पुन्हा!

मोहम्मद शमी दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टी-२० मालिका सुरू होण्यापूर्वी संघात परतण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धचे तीन टी-२० सामने अनुक्रमे २०, २३ आणि २५ सप्टेंबर रोजी होणार आहेत. त्यानंतर २८ सप्टेंबर पासून भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे.