मेलबर्न कसोटीत अखेरच्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या जिंकण्याच्या मनसुब्यांना रोखण्यास भारतीय संघाला यश आले आहे. कर्णधार महेंद्र सिंग धोनी आणि आर.अश्वीनच्या संयमी भागीदारीमुळे ऑस्ट्रेलिया विरुद्धची तिसरी कसोटी अनिर्णीत राखण्यात भारतीय संघाला यश आले.
कसोटीच्या अखेरच्या दिवशी ऑस्ट्रेलियाने दिलेल्या ३८४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना खेळपट्टीवर उतरलेल्या भारतीय संघाची सुरूवात निराशाजनक झाली. धावफलकावर अवघ्या दोन धावा जमा झाल्या असतानाच सलमीवीर शिखर धवन शुन्यावर बाद झाला त्यापाठोपाठ लोकेश राहुल अवघी एक धाव काढून बाद झाला. तर, पहिल्या डावात अर्धशतक झळकावणारा मुरली विजयही ११ धावांवर बाद झाला. त्यामुळे भारताची अवस्था बिकट झाली होती. मात्र, त्यानंतर कोहली आणि रहाणेने भारताचा डाव काहीसा सावरत संघाला १०० धावांचा टप्पा पार करून दिला. मात्र, त्यानंतर विराट कोहली ५४ धावांवर हॅरिसच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्यामुळे मागील दोन कसोट्यांप्रमाणे भारत पुन्हा पराभवाचा कित्ता गिरवणार असेच चित्र निर्माण झाले होते. चेतेश्वर पुजाराही २१ धावांवर माघारी परतला. अजिंक्य रहाणे संयमी खेळी करत असतानाच तो ४८ धावांवर बाद झाला. अखेर कर्णधार धोनीने आर.अश्विच्या साथीने संयमी खेळी करत मैदानावर तग धरून ठेवला आणि कसोटी अनिर्णीत राखण्यात टीम इंडियाला यश आले.
तत्पूर्वी ऑस्ट्रेलियानं दुसरा डाव ९ बाद ३१८ धावांवर घोषित केला. ऑस्ट्रेलियाच्या शॉन मार्शचे शतक अवघ्या एका धावेने हुकले. मार्श ९९ धावांवर असताना धावचीत झाला.याआधी मार्शनं रायन हॅरिसच्या साथीनं आठव्या विकेटसाठी ६९ धावांची भागीदारी रचली. भारताकडून उमेश यादव, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी आणि आर. अश्विननं प्रत्येकी दोन-दोन विकेट्स काढल्या.
स्कोअरकार्ड-
संग्रहित लेख, दिनांक 30th Dec 2014 रोजी प्रकाशित
मेलबर्न कसोटी अनिर्णीत राखण्यात भारताला यश
मेलबर्न कसोटीत अखेरच्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या जिंकण्याच्या मनसुब्यांना रोखण्यास भारतीय संघाला यश आले आहे.

First published on: 30-12-2014 at 10:15 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India vs australia 3rd test day 5 india rebuild after early hiccup against australia on day 5 in melbourne