IND vs AUS 5th T20I: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवा टी -२० सामना ब्रिसबेनच्या गाबामध्ये खेळवला जाणार आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा सामना असणार आहे. कारण भारतीय संघ या मालिकेत २-१ ने आघाडीवर आहे. मालिकेतील पहिला सामना पावसामुळे धुतला गेला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला होता. पुढील दोन्ही सामने जिंकून भारतीय संघाने मालिकेत २-१ ने आघाडी घेतली आहे. त्यामुळे भारतीय संघाकडे मालिका जिंकण्याची सुवर्णसंधी आहे. या सामन्यादरम्यान कसं असेल हवामान? जाणून घ्या.
अंतिम सामन्यावर पावसाचं सावट (IND vs AUS 5th T20I Weather Update)
ॲक्यूवेदरने दिलेल्या वृत्तानुसार, ब्रिसबेनमध्ये शनिवारी पाऊस पडण्याची शक्यता ७९ टक्के इतकी असणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना दुपारी १:४५ वाजता सुरू होणार आहे. तर स्थानिक वेळेनुसार हा सामना संध्याकाळी ६:१५ वाजता सुरू होणार आहे. संध्याकाळच्या वेळी ९९ टक्के ढगाळ वातावरण असेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर पावसाची शक्यता ७९ टक्के इतकी असणार आहे.
सामना रद्द झाल्यास काय होणार?
हा सामना पावसामुळे रद्द होण्याची चिन्ह आहेत. मालिकेतील पहिला सामना देखील पावसामुळे रद्द झाला होता. पण हा सामना दोन्ही संघांसाठी निर्णायक असणार आहे. त्यामुळे सामना पूर्ण होणं गरजेचं आहे. पण जर पावसामुळे पूर्ण होऊ शकला नाही, तर भारतीय संघाकडे ही मालिका २-१ ने आपल्या नावावर करण्याची संधी असणार आहे. पाऊस येणार हे तर निश्चित आहे. पण सामना किती वेळ सुरू राहणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचा संघ हा सामना जिंकून मालिका २-२ ने बरोबरीत आणण्याच्या प्रयत्नात असणार आहे.
या सामन्यासाठी अशी असू शकते भारतीय संघाची प्लेइंग ११:
अभिषेक शर्मा, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा/रिंकू सिंग, जितेश शर्मा/संजू सॅमसन (यष्टिरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शिवम दुबे/नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह/हर्षित राणा.
