IND vs AUS : ऑस्ट्रेलियाच्या खेळपट्टीवर मुंबईकर चमकले

रहाणेला लय सापडणे भारतीय संघासाठी दिलासादायक बातमी आहे.

चार सामन्याची कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी भारतीय संघ सराव सामना खेळत आहे. ऑस्ट्रेलिया XI विरोधातील सुरू असलेलेल्या सराव सामन्यात मुंबईकर खेळाडू चमकले आहेत. पाच जणांच्या अर्धशतकी खेळींच्या बळावर भारताने सर्वबाद ३५८ धावा केल्या आहेत. पृथ्वी शॉ आणि अजिंक्य रहाणेने दमदार अर्धशतकी खेळी केली आहे.

सहा तारखेपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेपूर्वी रहाणेला लय सापडणे भारतीय संघासाठी दिलासादायक बातमी आहे. पृथ्वी शॉने ( ६६ ), पुजारा (५४), कोहली (६४), रहाणे (५८) आणि हनुमा विहारी(५३) यांनी अर्धशतके झळकावली आहे. अजिंक्य रहाणे आणि पृथ्वी शॉ व्यतिरिक्त मुंबईकर रोहित शर्माने ४० धावांची खेळी केली. खेळपट्टीवर जम बसल्यानंतर मोठी खेळी करण्यात रोहितला अपयश आले आहे. के.एल राहुल पुन्हा एकदा आपल्या लौकीकास साजेशी खेळी करता आली नाही. तो तीन धावांवर बाद झाला. यष्टीरक्षक पंत अवघ्या ११ धावांवर बाद झाला.

चार दिवसाच्या कसोटी सामन्याचा पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे वाया गेला होता. आज दुसऱ्या दिवशी भारताने सर्वबाद ३५८ धावा केल्या आहेत. वरुणराजाने हजेरी लावत सामन्याचा पहिल्या दिवसा खेळ वाया घालवला. पहाटे साडे पाच वाजता हा सामना सुरू होणार होता, परंतु पावसाच्या हजेरीने सामना सुरुच झाला नाही. त्यामुळे भारताच्या सरावावर पाणी फेरले गेले. पण तसे असले तरी विराटसेनेने तो वेळ सत्कारणी लावत एक शक्कल लढवली. पावसामुळे मैदानात जाण्यात अर्थ नसल्याने खेळाडूंनी थेट जिममध्ये धाव घेतली आणि व्यायाम करत वेळेचा सदुपयोग केला. इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेतील पराभवापासून बोध घेत भारताने सराव सामना खेळण्याचा निर्णय घेतला आहे. कोणत्याही परिस्थितीत ऑस्ट्रेलियाला कमी लेखण्याची चूक भारतीय संघ करणार नाही.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: India vs australia ajinkya rahane and prithvi shaw made 50 runs

ताज्या बातम्या