आशा-निराशेच्या हिंदोळ्यावर दोन्ही कसोटी सामन्यांची रंगत अनुभवायला मिळाल्यावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या लढतीच्या थराराची क्रिकेटविश्वाला उत्सुकता आहे. विजयाची स्वप्ने पाहायची आणि मानहानीकारक पराभव पत्करायचा, ही भारताची परदेशातील कुचकामी स्थिती अजूनही तशीच आहे. भारतीय संघ आक्रमक असला तरी विदेशी मातीवर जिंकू शकत नाही हा न्यूनगंड भारतीय संघाने दूर केल्यास त्यांना हा सामना जिंकून मालिकेतील आव्हान कायम ठेवता येईल. शुक्रवारपासून सुरू होणारा तिसरा सामना भारतीय संघासाठी ‘करो या मरो’ असाच असेल, त्यामुळे मालिका वाचवणे हेच संघाचे मिशन असेल. दुसरीकडे दोन्ही सामन्यांमध्ये मिळवलेल्या विजयामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ आता मालिका विजयाचे स्वप्न पाहत आहे. मोक्याच्या क्षणी दमदार कामगिरी करत विजयाची पताका ऑस्ट्रेलियाने फडकावल्यामुळे त्यांचे मनोबल कमालीचे उंचावले असेल.
पहिल्या कसोटी सामन्यामध्ये भारताला ४८ धावांनी पराभव पत्करावा लागला होता, तर दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये भारत चार विकेट्सने पराभूत झाला होता. दोन्ही सामन्यांमध्ये भारताला विजयाची संधी होती. पहिल्या सामन्यात भारताच्या फलंदाजांनी तर दुसऱ्या सामन्यात गोलंदाजांनी कच खाल्ली होती. त्यामुळे भारताला जर तिसऱ्या सामन्यात विजय मिळवायचा असेल तर त्यांना या दोन्ही आघाडय़ांवर भर द्यावा लागेल. भारताच्या फलंदाजीमध्ये सातत्य पाहायला मिळालेले नाही. पहिल्या सामन्यात विराट कोहली, अजिंक्य रहाणे यांनी चांगली फलंदाजी केली होती, पण दुसऱ्या कसोटीत मात्र मुरली विजय आणि शिखर धवन या सलामीवीरांचा अपवाद वगळता अन्य फलंदाजांना धावा करता आल्या नाहीत. दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये रोहित शर्मा निष्प्रभ ठरल्याचे दिसले, त्यामुळे तिसऱ्या सामन्यात त्याच्या जागी सुरेश रैनाला संधी मिळू शकते. चेतेश्वर पुजाराला अजूनही लय सापडलेली नाही. गोलंदाजीमध्ये उमेश यादवचा भेदक मारा पाहायला मिळाला. पण इशांत शर्मा आणि  वरुण आरोन यांना लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्हन स्मिथने दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये दमदार कामगिरी केली आहे. डेव्हिड वार्नर आणि शेन वॉटसनही तंदुरुस्त झाले आहेत. वार्नर चांगल्या फॉर्मात असून त्याला ख्रिस रॉजर्सची हवी तशी साथ मिळालेली नाही. पण दुसऱ्या कसोटीतील दुसऱ्या डावात रॉजर्सने दमदार फलंदाजी केल्यामुळे त्याच्याकडून संघाला मोठी अपेक्षा असेल. वॉटसनला अजूनही लय सापडलेली नाही. गोलंदाजीमध्ये मिचेल जॉन्सन हा त्यांचा हुकमी एक्का आहे, पण जोश हॅझेलवूड आणि नॅथन लिऑन यांनी भारताच्या फलंदाजांना चांगलेच धारेवर धरल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे.
प्रतिस्पर्धी संघ
भारत : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), शिखर धवन, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, सुरेश रैना, वृद्धिमान साहा, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, कर्ण शर्मा, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, वरुण आरोन, उमेश यादव, धवल कुलकर्णी, लोकेश राहुल आणि नमन ओझा.
ऑस्ट्रेलिया : स्टिव्हन स्मिथ (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, ख्रिस रॉजर्स, शेन वॉटसन, शॉन मार्श, जो बर्न्‍स, ब्रॅड हॅडिन (यष्टिरक्षक), मिचेल जॉन्सन, रायन हॅरिस, नॅथल लिऑन, जोश हॅझेलवूड.
सामन्याची वेळ : सकाळी ५.०० वाजल्यापासून
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १ आणि ३ वाहिनीवर.

दोन कसोटी गमावल्यामुळे भारतीय संघ पिछाडीवर आहे. मात्र यातून पुनरागमन करण्याची सर्वोत्तम संधी मेलबर्न कसोटीतच आहे. येथील खेळपट्टी भारतीय फलंदाजांना साथ देणारी आहे. अ‍ॅडलेड आणि ब्रिस्बेन कसोटीत भारतीय संघ पराभूत झाला, मात्र त्यांच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी केली. धोनीच्या नेतृत्वशैलीचा मी चाहता आहे. त्याच्या कर्णधारपदाखालीच भारतीय संघाने विदेशात चांगली कामगिरी केली आहे. पंचपुनर्आढावा पद्धत अंगीकारणे या मालिकेत निर्णायक ठरू शकले असते.
-मायकेल बेव्हन, ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू

भारतीय संघ कठीण कालखंडातून जात आहे. यातून सावरत विजयपथावर परतण्यासाठी भारतीय संघाला संधी असेल तर ती मेलबर्न कसोटीतच आहे. मेलबर्नची संथ आणि पाटा खेळपट्टी भारतीय संघाला अनुकूल आहे. यामुळे मेलबर्नमध्ये विजयाची त्यांना संधी आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघाने नेहमीच्या आक्रमक पद्धतीने खेळ केल्यास चार दिवसातच विजय मिळवू शकतात. धोनीची नेतृत्त्वशैली बचावात्मक नाही. क्षेत्ररक्षणातील बदल त्याने खुबीने केले. मात्र भारताच्या तुलनेत ऑस्ट्रेलियात वेगवान क्रिकेट खेळण्याची आवश्यकता असते.
-रिकी पॉटिंग, ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार

भारतीय संघ अंतर्गत भांडणातच अडकला आहे. त्यामुळे त्यांना उद्देशून शेरेबाजी करण्याची आवश्यकता नाही. त्यांनी आमचे काम सोपे केले आहे. मैदानात जाऊन सर्वोत्तम खेळ करणे आमचे उद्दिष्ट आहे. याही सामन्यात आमचा तोच प्रयत्न असेल. निर्भेळ यश सुखावणारे असेल, तूर्तास एका वेळी एकाच सामन्याचा विचार करत आहोत. शेन वॉटसन तंदुरुस्त असून, तो तिसऱ्या क्रमांकावर खेळेल तर जो बर्न्‍स सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येईल. जलदगतीने षटके पूर्ण करणे आमच्यासाठी आवश्यक आहे. ब्रिस्बेनमध्ये वातावरण उष्ण होते. मेलबर्नमध्ये ही उणीव भरून काढण्याचा आमचा निर्धार आहे.
– स्टीव्हन स्मिथ, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार