भारतीय संघ गुरूवारी पुण्याच्या गहुंजे स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळणार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघ आपला विजयीरथ कामय राखण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. कोहलीने आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीसोबतच आपल्यातील नेतृत्त्व गुण देखील कसोटी संघाचे कर्णधारपद स्विकारल्यानंतर सिद्ध करून दाखवले. वेस्ट इंडिज, न्यूझीलंड, इंग्लंड आणि बांगलादेशविरुद्धच्या कसोटीत भारतीय संघाने निर्विवाद वर्चस्व गाजवले. यात कोहलीची कामगिरी लक्षणीय ठरली होती. आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत देखील कोहलीकडून भारतीय चाहत्यांना खूप अपेक्षा आहेत.

 

सामन्याच्या पूर्वसंध्येला विराट कोहलीने पत्रकार परिषदेत भारतीय संघाची बलस्थाने, कच्चे दुवे, मिचेल स्टार्कची गोलंदाजी आणि अशा अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. कोहलीने चार कसोटी मालिकांमध्ये सलग चार द्विशतकं ठोकण्याचा पराक्रम देखील केला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत देखील भारतीय चाहत्यांना कोहलीकडून चांगल्या कामगिरीच्या अपेक्षा आहेत. पण चाहत्यांच्या अपेक्षांबद्दल बोलताना कोहलीने आपल्याकडून कमी वयात जास्त अपेक्षा केल्या गेल्या, असे विधान पत्रकार परिषदेत केले. भारतात क्रिकेट हा धर्म असल्याने प्रेक्षकांकडे संयम नसतो. मी जेव्हा अवघ्या २२ वर्षांचा होतो तेव्हा माझ्याकडून ३५ वर्षीय खेळाडूच्या प्रगल्भतेच्या अपेक्षा केल्या गेल्या. पण मला माझ्या खेळावर आत्मविश्वास आहे, असे कोहली म्हणाला. प्रत्येक मालिकेनंतर मी स्वत:च्या कामगिरीचे परिक्षण करत बसत नाही. मी नेहमी माझ्या चुकांतून शिकण्याचा प्रयत्न करतो, असेही कोहली पुढे म्हणाला.

विराट कोहली सध्या दमदार फॉर्मात असून भारतीय संघाच्या या ‘रनमशिन’ला रोखण्याचे आव्हान ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांपुढे असणार आहे. त्यानुसार ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी तयारी देखील सुरू केली आहे.