ऑस्ट्रेलिया दौऱ्यात यष्टीरक्षणाची जबाबदारी मिळालेल्या ऋषभ पंतने अॅडलेड कसोटी सामन्यात महेंद्रसिंह धोनीच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. ऋषभने पहिल्या डावात यष्टींमागे ६ झेल टिपत, एका डावात यष्टींमागे सर्वाधिक झेल घेण्याच्या धोनीच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. महेंद्रसिंह धोनीने २००९ साली न्यूझीलंडविरुद्ध वेलिंग्टन कसोटीत पहिल्या डावात यष्टींमागे ६ झेल घेतले होते.

अवश्य वाचा – IND vs AUS : ऑस्ट्रेलियन कर्णधाराची विकेट आणि इशांत शर्माला मानाच्या पंक्तीत स्थान

अॅडलेड कसोटीच्या दुसऱ्या दिवशी ऋषभने यष्टींमागे उस्मान ख्वाजा, पीटर हँडस्काँब आणि कर्णधार टीम पेनचा झेल घेतला. तर तिसऱ्या दिवशी पंतने मिचेल स्टार्क, ट्रॅविस हेड आणि जोश हेजलवूड यांचा झेल टिपला. एकाच डावात यष्टींमागे सर्वाधिक झेल टिपण्याचा विक्रम हा पाकिस्तानचे माजी यष्टीरक्षक वासिम बारी, इंग्लंडचे बॉब टेलर, न्यूझीलंडचे इयान स्मिथ आणि वेस्ट इंडिजचे रिडली जेकब्स यांच्या नावावर जमा आहे. या सर्व यष्टीरक्षकांनी एका डावात ७ झेल टिपले होते. दरम्यान पहिल्या डावात भारताने ऑस्ट्रेलियाला २३५ धावांमध्ये ऑलआऊट करत १५ धावांची आघाडी घेतली आहे.

अवश्य वाचा – IND vs AUS : रोडावलेली प्रेक्षकसंख्या पाहून क्रिकेट ऑस्ट्रेलिया चिंतेत