पाच खेळाडूंसह संपूर्ण भारतीय संघ आज सिडनीत

तूर्तास, चौथी कसोटी ब्रिस्बेनलाच!

जैव-सुरक्षेच्या नियमांचा भंग केल्यामुळे सक्तीच्या विलगीकरणात असलेले उपकर्णधार रोहित शर्मासह पाच खेळाडू सोमवारी भारतीय क्रिकेट संघासह सोमवारी एकाच विशेष विमानाने तिसऱ्या कसोटीसाठी सिडनीला रवाना होणार आहेत.

जैव-सुरक्षित वातावरणाच्या नियमांचा भंग केल्याचा आरोप रोहित, सलामीवीर शुभमन गिल, यष्टिरक्षक ऋषभ पंत, वेगवान गोलंदाज नवदीप सैनी आणि फलंदाज पृथ्वी शॉ यांच्यावर आहे. या प्रकरणी ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’कडून चौकशी चालू असली तरी पाच खेळाडूंना संघासोबत प्रवासाला मनाई करण्यात आलेली नाही.

नवदीप सिंग या चाहत्याने ‘ट्विटर’वर भारतीय संघातील पाच खेळाडूंसोबतची चित्रफित टाकल्यानंतर शनिवारी हा वाद निर्माण झाला. त्यानंतर ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’ने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) साथीने संयुक्त चौकशी करीत असल्याचे घोषित केले.

‘‘भारतीय खेळाडूंनी जैव-सुरक्षेच्या नियमांचा भंग केल्याचे ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’ने आपल्या निवेदनात कुठेही म्हटलेले नाही. नियमांचे उल्लंघन झाले का, याची आम्ही चौकशी करीत आहोत, असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे पाच खेळाडूंच्या सिडनी प्रवासाबाबत कोणतेही बंधन घातलेले नाही,’’ असे ‘बीसीसीआय’च्या विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

‘‘नवदीपने खेळाडूंच्या भोजनाचे पैसेही भरल्याचा दावा करत त्यासंबंधीची पावती ‘ट्विटर’वर टाकली. याचप्रमाणे पंतने निघताना आपल्याला आलिंगन दिल्याचेही त्याने म्हटले आहे. या व्यक्तीने परवानगी न घेताच ही चित्रफित आणि पावती समाजमाध्यमांवर टाकल्याने हा वाद निर्माण झाला आहे,’’ असे सूत्रांनी सांगितले.

डोंगरे यांची भूमिका काय?

पाच खेळाडूंनी जैव-सुरक्षेच्या नियमांचा भंग केल्यानंतर ‘बीसीसीआय’चे प्रशासकीय व्यवस्थापक गिरीश डोंगरे यांची भूमिका वादात सापडली आहे. ‘बीसीसीआय’चे हे कर्मचारी खेळाडूंकडून जैव-सुरक्षेच्या शिष्टाचारांचे पालन करण्यासाठी नेमले आहेत. खेळाडूंना वेळोवेळी नियमांची जाणीव करून देण्याची जबाबदारी या व्यक्तीवर होती, असे ‘बीसीसीआय’च्या सूत्रांनी सांगितले.

तूर्तास, चौथी कसोटी ब्रिस्बेनलाच!

कडक विलगीकरणाच्या नियमामुळे पाहुणा भारतीय संघ ब्रिस्बेनला जाण्यास तयार नसल्याने या कसोटीपुढे संकट ओढवल्याचे वृत्त ऑस्ट्रेलियातील प्रसारमाध्यमांनी दिले होते. मात्र तूर्तास, चौथी कसोटी ब्रिस्बेनलाच होणार असल्याची ग्वाही सूत्रांनी दिली आहे. चौथा कसोटी सामना १५ जानेवारीपासून सुरू होणार आहे. न्यू साऊथ वेल्स आणि क्विन्सलँड या राज्य शासनांच्या कडक सीमा धोरणांमुळे ही समस्या निर्माण झाली आहे. करोना साथीचा प्रादूर्भाव वाढल्यामुळे न्यू साऊथ वेल्सहून क्विन्सलँडच्या प्रवासास नागरिकांना मज्जाव करण्यात आला आहे. परंतु खेळाडू जैव-सुरक्षित वातावरणात असल्यामुळे त्यांच्यासाठी नियम शिथिल करण्यात आला आहे. ब्रिस्बेनचा सामना हलवण्याबाबत ‘बीसीसीआय’ने अद्याप तरी कोणतीही विनंती ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’कडे केलेली नाही.

रहाणेकडे उपजत नेतृत्वगुण -चॅपेल

मेलबर्न कसोटीच्या विजयाचा शिल्पकार भारताचा प्रभारी कर्णधार अजिंक्य रहाणेकडे उपजत नेतृत्वगुण आहेत. कौशल्य आणि धाडस या गुणांमुळे तो आपला ठसा उमटवतो, अशी प्रशंसा ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू इयान चॅपेल यांनी केली आहे. ‘‘मेलबर्न क्रिकेट मैदानावर रहाणेने निर्दोष नेतृत्व केले. २०१७मध्ये ज्यांनी धरमशाला येथे रहाणेला नेतृत्व करताना पहिले असेल, त्यांनी त्याच्यातील ही नेतृत्व कला त्याचवेळी ओळखली असेल,’’ असे चॅपेल यांनी सांगितले. ‘‘जेव्हा परिस्थिती हाताबाहेर जाते, तेव्हा तो शांतपणे त्याला सामोरा जातो. त्याने संघातील सहकाऱ्यांकडून योग्य आदर मिळवला आहे, जो चांगल्या कर्णधारासाठी आवश्यक असतो,’’ असे चॅपेल म्हणाले.

पावसामुळे भारताचे सराव सत्र रद्द

पावसामुळे मेलबर्न क्रिकेट मैदानावरील भारतीय क्रिकेट संघाचे सराव सत्र रद्द करण्यात आले. त्यामुळे खेळाडूंनी व्यायामशाळेत तंदुरुस्तीकडेच लक्ष केंद्रित केले.

सिडनीत सलग सामने नकोत -मॅथ्यू

सिडनीत सलग दोन कसोटी सामने नकोत. भारतीय संघ ब्रिस्बेनच्या कडक विलगीकरणाच्या नियमाला विरोध करीत आहे. त्यामुळे अखेरचा कसोटी सामना ब्रिस्बेनहून सिडनीत स्थलांतरित करू नये, अशी सूचना ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर मॅथ्यू वेडने रविवारी केली आहे. क्विन्सलँडच्या कडक विलगीकरणाचे दडपण घेऊन भारतीय संघ ब्रिस्बेनला जाण्यास विरोध दर्शवत आहे. परंतु त्यामुळे सिडनीला सलग सामन्यांचे आयोजन करू नये, असे वेडने म्हटले आहे.

‘‘कार्यक्रमपत्रिकेबाबत ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’ मंडळ ठाम आहे. त्यामुळे ब्रिस्बेनलाच अखेरचा सामना होईल. कडक विलगीकरण आणि जैव-सुरक्षेचे शिष्टाचार तिथे असतील. परंतु आम्ही या आव्हानांसाठी सज्ज आहोत,’’ असे वेडने सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: India vs australia team india in sydney mppg