बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा दणदणीत पराभव केल्याने पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर भलताच प्रभावित झालाय. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वाचं त्याने तोंडभरुन कौतुक केलंय. पहिल्या सामन्यात दारुण पराभव झाल्यानंतर अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात भारतीय खेळाडूंनी केलेली कामगिरी अतुलनीय असल्याचं शोएब अख्तर म्हणाला.

अजिंक्य रहाणे शांत आणि संयमी कर्णधार :-
स्पोर्ट्स टुडेला दिलेल्या मुलाखतीत भारतात ही मालिका जिंकण्याची क्षमता असल्याचं त्याने म्हटलं. तसेच अॅडिलेडमध्ये झालेल्या दारुण पराभानंतर दुसऱ्या कसोटीत दमदार पुनरागमन केल्याबद्दल त्याने रहाणे आणि संघ व्यवस्थापनाचंही कौतुक केलं. अजिंक्य रहाणे जोरजोरात ओरडत नाही किंवा मैदानावर काही वाईट गोष्टी करत नाही, तो शांत राहतो आणि पाहिजे त्या गोष्टी शांतपणेच करतो…त्याच्या नेतृत्वात संघाने हिंमत दाखवली आणि उत्कृष्ट कामगिरी केली, असं अख्तर म्हणाला.

३६ वर ९ बाद की ३६९ वर ९ बाद? :-
“पहिल्या कसोटी सामन्यावेळी सकाळी उठल्यावर मला ३६ वर ९ बाद अशी भारताची धावसंख्या दिसली, पण ती धावसंख्या ३६९ वर ९ बाद अशी असेल असं मला काही क्षणासाठी वाटलं होतं” अशी आठवणही अख्तरने सांगितली. तसेच आता भारताने मिळालेली लय कायम ठेवावी आणि ऑस्ट्रेलियावरील दबाव वाढवावा असा सल्ला त्याने भारतीय संघाला दिला.

कोहली-शमी नसताना मिळवलेला विजय महत्त्वाचा :-
संघात विराट कोहली, मोहम्मद शमी यांच्यासारखी मोठी नावं नसतानाही विजय मिळवल्याने भारताचा हा विजय महत्त्वाचा ठरतो. तुम्ही प्रशिक्षक रवी शास्त्री, अजिंक रहाणे किंवा टीम इंडियाबाबत काहीही बोला पण माझ्यामते भारताची खरी ताकद संघातून खेळणारे खेळाडू नव्हे तर संघात संधी न मिळालेले खेळाडू ( बेंच स्ट्रेंथ ) आहे. त्यांना संधी मिळाली आणि त्यांनी संधीचं सोनं केलं.

ऑस्ट्रेलियाचा ऑस्ट्रेलियात पराभव :-
“10-15 वर्षांपूर्वी भारत किंवा पाकिस्तान किंवा उपखंडातील एखादा देश ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात जाऊन पराभूत करेल असा कोणी विचार तरी केला होता का…पण आता हे घडतंय…आता या मालिकेत आक्रमकपणा बघायला मिळेल…भारतीय संघाने ही मालिका जिंकावी असं मला वाटतं कारण भारताने खरंच दमदार पुनरागमन केलंय, दारुण पराभवानंतर संघातील सहकऱ्यांनी चांगली हिंमत दाखवली आणि अजिंक्यच्या शतकाने तर सर्व समीकरणं बदलली”, असं अख्तर म्हणाला.