भारताविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात यजमान संघ तीन वेगवान गोलंदाज खेळवण्याची शक्यता कमी आहे, असे संकेत बांगलादेशचे गोलंदाजीचे प्रशिक्षक हीथ स्ट्रीक यांनी सांगितले.
‘‘आम्ही अंतिम संघात दोन वेगवान गोलंदाज खेळवण्याच्या बेतात आहोत, परंतु खेळपट्टीची योग्य पाहणी करून प्रशिक्षक आणि निवड समिती सदस्य संघ निश्चित करतील,’’ असे स्ट्रीक यांनी सांगितले.  दुखापतीतून सावरून संघात परतलेल्या रुबेल हुसेनचे स्ट्रीकने स्वागत केले. खान साहेब उस्मान अली स्टेडियमची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना पुरेशी साथ देत नाही. त्यामुळे आम्ही दोन वेगवान गोलंदाजांसह खेळू, असे मत स्ट्रीकने व्यक्त केले.
‘‘रुबेल परतल्याने संघाचा आत्मविश्वास दुणावला आहे. कारण दुखापतीच्या आधी तो चांगला फॉर्मात होता. खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना झगडायला लावणारी आहे. मोहम्मद शाहीदने पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेत अप्रतिम गोलंदाजी केली होती. त्यामुळे शाहीदकडून संघाच्या मोठय़ा अपेक्षा आहेत,’’ असे स्ट्रीकने सांगितले.
लिटॉन दासकडे यष्टीरक्षण
कर्णधार मशफिकर रहिमच्या बोटाला दुखापत झाल्यामुळे बुधवारपासून सुरू होणाऱ्या भारताविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात बांगलादेशच्या युवा लिटॉन दासकडे यष्टीरक्षणाची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे.
एप्रिलमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या खुलना कसोटी सामन्यात रहिमच्या उजव्या बोटाला दुखापत झाली होती. रहिमने शनिवारी फतुल्ला येथे संघासोबत फलंदाजीचा आणि लिटॉनने यष्टीरक्षणाचा सराव केला.
बांगलादेशचे व्यवस्थापक खलीद महमूद यांचा राजीनामा
 बांगलादेश संघाचे व्यवस्थापक खलीद महमूद यांनी कौटुंबीक कारणास्तव राजीनामा दिला आहे. बांगलादेशमधील ‘प्रोथोम आलो’ दैनिकाने बांगलादेश क्रिकेट मंडळाचे (बीसीबी) मुख्य कार्यकारी निझामुद्दीन चौधरी यांच्याकडे महमूद यांनी आपला राजीनामा सादर केल्याचे म्हटले आहे.
भारतीय संघाचा कसून सराव
बांगलादेशमध्ये आगमन झाल्यानंतर लगेचच भारतीय क्रिकेट संघाने येथील शेर-ए-बांगला स्टेडियमवर दोन तास कसून सराव केला. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ कोलकाता येथून सकाळच्या विमानाने बांगलादेशला पोहोचला. लगेचच दुपारच्या सत्रात त्यांनी फलंदाजी व गोलंदाजीचा सराव केला.  
‘‘बांगलादेशात आगमन झाल्यानंतर कोहली व त्याच्या सहकाऱ्यांनी लगेचच सराव करण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशच्या खेळाडूंनी फतुल्ला येथे सराव केला. तेथेच हा सामना होणार आहे. मंगळवारी आमचे खेळाडू तेथे सराव करणार आहेत,’’ असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे व्यवस्थापक विश्वरूप डे यांनी सांगितले.