विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीतील पराभवाची सव्याज परतफेड गुरुवारी बांगलादेशने केली आहे. ‘वाघाप्रमाणे विजय संपादन केला’ अशा शब्दांत बांगलादेशातील स्थानिक वृत्तपत्रांनी या विजयाचे कोडकौतुक केले. या धक्क्यातून सावरणाऱ्या भारतासमोर आता मालिका गमावण्याचा धोका समोर आहे. दडपण आणि अपेक्षांचे ओझे समर्थपणे पेलणाऱ्या कर्णधार महेंद्रसिंग धोनीसमोर रविवारी होणारी दुसरी एकदिवसीय लढत जिंकण्याचे आव्हान आहे. या सामन्यावरही पावसाचे सावट असल्याने भारताच्या चिंतेत भर पडली आहे.
तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील सलामीच्या लढतीत बांगलादेशकडून भारताने ७९ धावांनी हार पत्करली. जागतिक क्रिकेटमधील ‘लिंबू-टिंबू’ राष्ट्रांमध्ये गणल्या जाणाऱ्या बांगलादेशने विश्वचषकाची उपांत्यपूर्व फेरी गाठून तसा सावधगिरीचा इशाराच एक प्रकारे दिला होता. त्यानंतर मश्रफी मुर्तझाच्या नेतृत्वाखालील युवा गुणवान संघाने पाकिस्तानविरुद्धची मालिका ३-० अशी जिंकण्याची किमया साधली होती. आपली तीच कामगिरी बांगलादेशने भारताविरुद्ध लढताना कायम राखली. पहिल्या सामन्यात कर्णधार धोनी आणि सामनावीर मुस्ताफिझूर रहमान यांच्यातील टक्कर ही दोघांनाही महागात पडली आहे. धोनीला मानधनाच्या ७५ टक्के तर रहमानला ५० टक्के रक्कम दंड ठोठावण्यात आला आहे.
कर्णधार धोनीचा फॉर्म हासुद्धा भारतीय संघासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. याशिवाय ‘कॅप्टन कुल’ या विशेषणाला तो जागत नाही. रहमानला धक्का दिल्याच्या घटनेला आयसीसीच्या सामनाधिकाऱ्यांनी दुसऱ्या स्तरावरील कलमाचा भंग केल्याचा निर्वाळा दिला, हे धोनीच्या दृष्टीने चांगले ठरले. अन्यथा त्याला दोन सामन्यांच्या बंदीची शिक्षा झाली असती. विश्वचषक स्पध्रेत दुबळ्या झिम्बाब्वेविरुद्ध ८५ धावा आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य लढतीत ६५ धावा, हे धोनीच्या फलंदाजीचे योगदान. त्याव्यतिरिक्त धोनीचा प्रभाव दिसू शकलेला नाही. याशिवाय भारताची संघटित कामगिरीसुद्धा मैदानावर दिसत नाही.
शिखर धवन सलामीच्या सामन्यात मोठी धावसंख्या उभारू शकला नाही. मात्र फतुल्लाच्या शतकी कामगिरीची पुनरावृत्ती करण्यासाठी तो उत्सुक आहे. रोहित शर्माकडून भारताला मोठय़ा अपेक्षा आहेत. विराट कोहलीसुद्धा धावांसाठी झगडत आहे. अजिंक्य रहाणेला सूर गवसला की, तो धोकादायक सिद्ध होतो.
धोनीने बांगलादेशच्या वेगवान माऱ्याचे कौतुक केले होते. मात्र भारताच्या वेगवान गोलंदाजांनी कामगिरी सुधारण्याची आवश्यकता आहे. उमेश यादवच्या गोलंदाजीत सातत्याचा अभाव दिसून आला, तर धोनीचा विश्वासू गोलंदाज मोहित शर्माला बांगलादेशच्या फलंदाजांनी चांगलाच चोप दिला. भुवनेश्वर कुमारलाही योग्य पद्धतीने गोलंदाजी करता आली नाही. फक्त आर. अश्विन आणि सुरेश रैना यांनी फिरकीच्या बळावर बांगलादेशला वेसण घातली. अन्यथा त्यांना ३५०चा टप्पा सहज ओलांडता आला असता. मुस्ताफिझूर रहमानने आपल्या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजीने पहिली लढाई जिंकली आहे. आता दुसऱ्या लढाईत भारत कसे आव्हान टिकवते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
संघ
भारत : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार/यष्टीरक्षक), शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, सुरेश रैना, रविचंद्रन अश्वीन, रवींद्र जडेजा, उमेश यादव, मोहित शर्मा, भुवनेश्वर कुमार, अंबाती रायुडू, धवल कुलकर्णी, अक्षर पटेल, स्टुअर्ट बिन्नी.
बांगलादेश : मश्रफी मुर्तझा (कर्णधार), तमिम इक्बाल, सौम्य सरकार, मशफिकर रहिम (यष्टीरक्षक), शाकिब अल हसन, शब्बीर रहमान, नासिर हुसैन, रुबेल हुसैन, तस्किन अहमद, मस्तफिझूर रहमान, रॉनी तालुकदार, मोमिनूल हक, अराफत सनी.

सामन्याची वेळ
दुपारी २.३० वा. पासून

थेट प्रक्षेपण
स्टार स्पोर्ट्स वाहिनीवर.