अश्विन ‘पंच’मीचा योग रविवारी खान साहेब उस्मान अली स्टेडियमवर होता. रविचंद्रन अश्विनने आपल्या लाजवाब फिरकीच्या बळावर बांगलादेशचा डाव गुंडाळला. परंतु पाचही दिवस पावसामुळे वारंवार धुमाकूळ घातलेल्या या एकमेव कसोटी सामन्यांत विजयाची आशा मात्र धरता आली नाही आणि अनिर्णीत निकालावर भारताला समाधान मानावे लागले.
या कसोटी सामन्यात २५०हून अधिक षटकांचे पावसामुळे नुकसान झाले. किमान तीन दिवसांचा खेळ झाला असता, तर सामना निकाली ठरवण्याची पाहुण्या संघाला संधी मिळाली असती. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही प्रांतांमध्ये या कसोटीत छाप पाडली.
भारताच्या ६ बाद ४६२ या धावसंख्येला उत्तर देताना बांगलादेशने पहिल्या डावात ६५.५ षटकांत २५६ धावा केल्या. बांगलादेशकडून इम्रूल कायेसने सर्वाधिक ७२ धावा केल्या. युवा पदार्पणवीर लिटॉन कुमार दासने ४५ चेंडूंत ४४ धावा काढल्या. फॉलोऑन टाळण्यासाठी बांगलादेशला ७ धावा कमी पडल्या. अश्विनने २५ षटकांत ८७ धावांत ५ बळी घेतले. हरभजन सिंगने ६४ धावांत ३ बळी घेत त्याला छान साथ दिली. हरभजनने रविवारी कसोटी क्रिकेटमधील सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या पंक्तीत नववे स्थान मिळवताना पाकिस्तानच्या वसिम अक्रमला मागे टाकले.
पाचव्या दिवशी खेळ थांबला तेव्हा बांगलादेशने दुसऱ्या डावात बिनबाद २३ धावा केल्या होत्या.
संक्षिप्त धावफलक
भारत (पहिला डाव) : ६ बाद ४६२  (डाव घोषित) विरुद्ध बांगलादेश (पहिला डाव) : २५६ (इम्रूल कायेस ७२; आर. अश्विन ५/८७)
बांगलादेश (दुसरा डाव) : बिनबाद २३

भारताची घसरण
आयसीसीने जाहीर केलेल्या कसोटी क्रमवारीत भारताची दोन गुणांची व एका स्थानाची घसरण झाली आहे. बांगलादेशविरुद्धच्या एकमेव कसोटी सामना अनिर्णित राहिल्याने भारत चौथ्या स्थानावर घसरला.
’दक्षिण आफ्रिका (१३०), ऑस्ट्रेलिया (१०८) आणि न्यूझीलंड (९९) अनुक्रमे पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर विराजमान आहेत.