भारताविरूद्धच्या पहिल्या टी २० सामन्यात बांगलादेशने विजय मिळवला. भारताने दिलेले १४९ धावांचे आव्हान अनुभवी मुश्फिकुर रहीमच्या तडाखेबाज अर्धशतकाच्या बळावर बांगलादेशने सहज पूर्ण केले. या विजयासह बांगलादेशने भारताविरूद्ध टी २० इतिहासातील पहिला सामना जिंकला. या आधीच्या ८ सामन्यात भारताने बांगलादेशला धूळ चारली होता.

१४९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशची सुरूवात काहीशी खराब झाली होती. लिटन दास ७ धावांवर तर मोहम्मद नईम २६ धावांवर माघारी परतला होता. सामना रंगतदार अवस्थेत असताना खेळपट्टीवर स्थिरावलेला सौम्या सरकारही ३९ धावांवर त्रिफळाचीत झाला. त्यामुळे भारत सामना जिंकणार अशी आशा चाहत्यांना होती. पण सामन्यात एक अशी घटना घडली की भारताच्या हातून सामना निसटला.

मुश्फिकुर रहीम सामन्याचा सगळा भार आपल्या खांद्यावर घेत तडाखेबाज खेळत होता. पण तो मुश्फिकुर ३६ चेंडूत ३८ धावांवर असताना क्रुणाल पांड्याने त्याचा झेल सोडला. चेंडू उंच उडून पांड्या दिशेने गेला. पण क्रुणाल पांड्याला तो झेलणे शक्य झाले नाही. त्यानंतर तुफान फटकेबाजी करत मुश्फिकुरने ४३ चेंडूत ८ चौकार आणि १ षटकार खेचत नाबाद ६० धावा केल्या.

तो झेल क्रुणाल पांड्याने पकडला असता तर सामन्याचा निकाल कदाचित भारताच्या बाजूने लागू शकला असता.

दरम्यान, त्याआधी पहिल्या डावात भारताचा कर्णधार रोहित शर्मा (९), लोकेश राहुल (१५), श्रेयस अय्यर (२२) झटपट बाद झाले. शिखर धवन आणि ऋषभ पंत यांच्यात चांगली भागीदारी होत असतानाच मैदानात त्या दोघांमध्ये धाव घेण्यावरून गोंधळ झाला. त्यामुळे शिखर धवन धावबाद झाला. धवनने ३ चौकार आणि १ षटकार लगावत ४२ चेंडूत ४१ धावा केल्या. पदार्पणाचा सामना खेळणारा मुंबईकर शिवम दुबेही एक धाव करून बाद झाला. पाठोपाठ दिल्लीकर ऋषभ पंतही २७ धावांवर माघारी परतला. शेवटच्या टप्प्यात क्रुणाल पांड्या आणि वॉशिंग्टन सुंदर या दोघांनी केलेल्या फलंदाजीच्या जोरावर भारताने २० षटकात ६ बाद १४८ पर्यंत मजल मारली होती.