Olympics Men’s Hockey: स्वप्नभंग… भारताचा बेल्जियमकडून ५-२ ने पराभव; आता कांस्यपदकासाठी खेळणार

पहिल्या हाफमध्ये सामना बरोबरीत राखण्यात यश आल्यानंतर भारतीय संघाला तिसऱ्या आणि चौथ्या क्वार्टरमध्ये एकही गोल करता आला नाही

India vs Belgium Men Hockey Semifinal
भारत आता कांस्य पदकासाठी खेळणार आहे. (फोटो ट्विटरवरुन साभार)

अपेक्षांचे प्रचंड ओझे असलेल्या भारतीय पुरुष संघाला तब्बल ४१ वर्षांनंतर ऑलिम्पिक पदकाचा दुष्काळ संपवण्यात अपयश आलं. विश्वविजेत्या बेल्जियमविरोधात मैदानात उतरलेल्या भारतीय संघाला ५-२ च्या फरकाने पराभव झाला. आठ सुवर्णपदकांसह ११ ऑलिम्पिक पदके खात्यावर असणाऱ्या भारताने एके काळी हॉकीमध्ये निर्विवाद वर्चस्व गाजवले होते. मनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील सध्याच्या भारतीय संघाला त्या यशाची पुनरावृत्ती साद घालत असतानाच बेल्जियमकडून झालेल्या पराभवामुळे भारतीय संघाची टोक्यो ऑलिम्पिकमधील ही ड्रीम रन संपुष्टात आली. उपांत्य फेरीमध्ये भारत कशी कामगिरी करतो याकडे सर्व जगाचं लक्ष लागलं होतं. मात्र पहिल्या हाफमध्ये सामना बरोबरीत राखण्यात यश आल्यानंतर भारतीय संघाला तिसऱ्या आणि चौथ्या क्वार्टरमध्ये एकही गोल करता आला नाही. भारत आता कांस्यपदकासाठी खेळणार आहे.

नक्की वाचा >> सामन्यात काय काय घडलं पाहा स्कोअकार्ड

पहिल्या पाच मिनिटांमध्ये बेल्जियमने सामन्यावर वर्चस्व गाजवलं. सामना सुरु झाल्यानंतर काही मिनिटांमध्येच बेल्जियमने गोल करत १-० ची आघाडी घेतली. मात्र त्यानंतर भारताने दोन मिनिटांच्या अंतरात एकामागोमाग एक दोन गोल करत २-० ने आघाडी मिळवली. पहिल्या क्वार्टरमध्ये भारताने २-१ ची आघाडी कायम ठेवली. दुसऱ्या क्वार्टरमध्ये केवळ एक गोल झाला. बेल्जियमने केलेल्या या एकमेव गोलमुळे हाफ टाइमनंतर सामना २-२ च्या बरोबरीत राहिला. मात्र तिसऱ्या आणि चौथ्या क्वार्टरमध्ये भारतीय संघाला एकही गोल करता आला नाही. दुसरीकडे बेल्जियमने शेवटच्या क्वार्टरमध्ये तीन गोल झळकावले.

नक्की वाचा >> India vs Belgium सामना लाइव्ह पाहणाऱ्या मोदींची भारताच्या पराभवानंतरची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

बेल्जियमकडून अ‍ॅलेक्झॅण्डर हेनरीक्सने हॅटट्रीक केली. भारताला पहिल्या दोन क्वार्टरमध्ये बेल्जियमला बरोबरीत रोखण्यात यश आलं. तिसऱ्या क्वार्टरमध्ये एकाही संघाला गोल करता आला नाही. नंतर मात्र बेल्जियमला एकापाठोपाठ एक अनेक पेनल्टी कॉर्नर मिळाले आणि त्यांनी संधीचं सोनं करत भारतावर आघाडी मिळवली. नंतर ही आघाडी कायम ठेवत बेल्जियमने ५-२ ने सामना जिंकला. बेल्जियमने आपल्या पाच पैकी चार गोल पेनल्टी कॉर्नरवर केले. बेल्जियम यंदा पुन्हा एकदा अंतिम सामन्यात खेळणार आहे. रियो ऑलिम्पिकमध्ये बेल्जियमला रौप्यपदक मिळालं होतं.

नक्की वाचा >> India vs Belgium Men Hockey Semifinal : सामना सुरु असतानाच पंतप्रधान मोदींचं ट्विट, म्हणाले…

१९८० च्या ऑलिम्पिकमधील भारताने अखेरचे सुवर्णपदक ब्रिटनला ३-१ अशा फरकाने हरवून प्राप्त केले होते. पण त्यावेळी उपांत्य फेरीचा सामना नव्हता. १९७२ मधील म्युनिक ऑलिम्पिकमध्ये भारताने अखेरची उपांत्य फेरी गाठली होती. तेव्हा पाकिस्तानकडून भारताने ०-२ अशी हार पत्करली होती. दुसऱ्या साखळी सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून १-७ असा पराभव पत्करल्यानंतर भारताने सलग चार सामन्यांमध्ये दणदणीत विजय मिळवत आजच्या ऐतिहासिक उपांत्य फेरीच्या सामन्यात प्रवेश केला होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: India vs belgium men hockey semifinal india lost to belgium tokyo olympics scsg