IND vs ENG Day 3: भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघ सध्या मजबूत स्थितीत आहे. पाहिला दिवस भारतीय फलंदाजांनी गाजवल्यानंतर दुसऱ्या दिवशी जसप्रीत बुमराहने आपल्या गोलंदाजीने कहर केला. इंग्लंडचा संघ २०० पार पोहोचला आहे. पण, बुमराहने संघातील ३ प्रमुख फलंदाजांना माघारी धाडलं आहे. तिसरा दिवस सामन्याला कलाटणी देणारा ठरू शकतो. मात्र, तिसऱ्या दिवशी पाऊस पडू शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तिसऱ्या दिवशी खरच पाऊस पडणार का? आणि पाऊस पडला तर कोणासाठी फायदेशीर ठरेल? जाणून घ्या.
या सामन्यातील दुसऱ्या दिवशीही पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. पावसामुळे काही मिनिटे खेळ थांबला पण याचा सामन्यावर फार परिणाम झाला नाही. पाऊस पडला तर गोलंदाजांना कमी मदत मिळेल. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर रात्रभर पाऊस पडलेला नाही. जोरदार पाऊस पडेल असा अंदाज होता, पण हलका पाऊस पडला.
तिसऱ्या दिवशी कसं असेल हवामान?
जर या सामन्यातील तिसऱ्या दिवसाच्या हवामानाबद्दल बोलायचं झालं, तर तिसऱ्या दिवशी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ॲक्यूवेदरनुसार, या सामन्यातील तिसऱ्या सेशनमध्ये जोरदार पाऊस पडू शकतो. त्यामुळे सामन्यात अडथळा निर्माण होऊ शकतो. स्थानिक वेळेनुसार दुपारी २ नंतर पाऊस पडण्याचा अंदाज हा ४५ टक्के इतका असणार आहे. पाऊस पडण्याआधी ढगाळ वातावरण असल्याने गोलंदाजांना मदत मिळू शकते. त्यामुळे भारतीय गोलंदाजांकडे इंग्लंडचा पहिला डाव लवकरात लवकर गुंडाळण्याची संधी असणार आहे.
इंग्लंडची दमदार सुरूवात
या सामन्यात भारतीय संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आला. प्रथम फलंदाजी करताना भारताने ४७१ धावांचा डोंगर उभारला. भारतीय संघाकडून शुबमन गिलने सर्वाधिक १४७ धावांची खेळी केली. तर ऋषभ पंतने १३४ आणि यशस्वी जैस्वालने १०१ धावांची खेळी केली. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंग्लंडला सुरुवातीला मोठे धक्के बसले. पण ओली पोपने दमदार शतक ठोकलं. तर बेन डकेटने ६२ धावांची खेळी केली. इंग्लंडने ३ गडी बाद २०९ धावा केल्या आहेत. इंग्लंडचा संघ २६२ धावांनी पिछाडीवर आहे.