Team India Record At Edgbaston: काही दिवसांपूर्वी भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांची मालिका पार पडली. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात या मालिकेत भारतीय संघाला ४-० ने दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता. आता दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका सुरु झाली आहे. विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराहसारखे अनुभवी खेळाडू संघात परतले आहेत. त्यामुळे भारतीय संघाची ताकद दुपटीने वाढली आहे. या मालिकेतील पहिला सामना एजबस्टनमध्ये खेळवला गेला. या सामन्यात इंग्लंडचा डाव अवघ्या २५८ धावांवर आटोपला. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाने ४६ व्या षटकात दिलेलं आव्हान पूर्ण केलं आणि मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. या विजयासह भारतीय संघाने एक खास रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.
या सामन्यातील पहिल्या डावात भारतीय गोलंदाजांनी दमदार गोलंदाजी करुन इंग्लंडला कमी धावांवर रोखलं. त्यानंतर धावांचा पाठलाग करताना विराट कोहली आणि रोहित शर्मासारखे अनुभवी फलंदाज फ्लॉप राहिले, पण शुबमन गिल आणि शेवटी अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर यांनी दमदार फलंदाजी करुन भारतीय संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. गिलने ७५ चेंडूंचा सामना करत ८० धावांची खेळी केली. पण त्यानंतर तो रिटायर्ड हर्ट होऊन मैदानाबाहेर गेला. त्यानंतर अक्षर पटेलने ५७ आणि वॉशिंग्टन सुंदरने ५२ धावांची खेळी करून शेवटपर्यंत किल्ला लढवला. भारतीय संघाने हे आव्हान ६ गडी राखून पूर्ण केलं.
एजबस्टनच्या मैदानावर घडवला इतिहास
या विजयासह भारतीय संघाच्या नावे एका मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे. इंग्लंडला २०१५ नंतर पहिल्यांदाच एजबस्टनच्या मैदानावर पराभवाचा सामना करावा लागला आहे. इंग्लंडने या मैदानावर खेळताना २०१५ नंतर एकही सामना गमावलेला नव्हता. याआधीही इंग्लंडला भारतानेच पराभूत केलं होतं. २०१४ मध्ये झालेल्या सामन्यात इंग्लंडला एजबस्टनच्या मैदानावर पराभवाचा सामना करावा लागला होता.
वनडेमध्ये भारतीय संघाचा दबदबा
हा सामना जिंकून भारतीय संघाने इंग्लंडविरूद्ध खेळताना सलग सहाव्या विजयाची नोंद केली आहे. याआधी भारतीय संघाने इंग्लंडविरूद्ध खेळताना लागोपाठ ५ सामने जिंकले होते. आता सहावा सामना जिंकताच, भारताने हा खास रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. भारतीय संघ हा या मालिकेत १-० ने आघाडीवर आहे. तर मालिकेतील दुसरा सामना १६ जुलैला कार्डिफमध्ये खेळवला जाणार आहे.
