अँडरसनच्या माऱ्यापुढे भारत ४ बाद १२५

नॉटिंगहॅम : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक कसोटी बळी मिळवणारा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनच्या (२/१५) भेदक माऱ्यापुढे भारताची फलंदाजी ढेपाळली. त्यामुळे के. एल. राहुल (खेळत आहे ५७) आणि रोहित शर्मा (३६) यांनी दमदार सलामी दिल्यानंतरही पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवसअखेर भारताची ४ बाद १२५ धावा अशी अवस्था झाली.

अंधुक सूर्यप्रकाश आणि पावसामुळे दुसऱ्या दिवशी ३३.४ षटकांचाच खेळ झाला. दुसऱ्या सत्रात खेळ थांबवण्यात आला, तेव्हा राहुलच्या साथीने यष्टीरक्षक ऋषभ पंत ७ धावांवर खेळत होता. भारत पहिल्या डावात अद्याप ५८ धावांनी पिछाडीवर आहे.

बिनबाद २१ धावांवरून सुरुवात करताना रोहित आणि राहुल यांनी सावध फलंदाजी केली. ही जोडी पहिले सत्र आरामात खेळून काढणार, असे वाटत असताना ऑली रॉबिन्सनने रोहितला बाद करून उपाहारापूर्वी अखेरच्या षटकात भारताला पहिला झटका दिला. रोहित-राहुलने ९७ धावांची सलामी नोंदवली.

दुसऱ्या सत्रात अँडरसनचे गोलंदाजीसाठी आगमन होताच भारताचा डाव घसरला. चेतेश्वर पुजारा (४) आणि कर्णधार विराट कोहली (०) यांना लागोपाठच्या चेंडूवर बाद करून अँडरसनने भारताला अडचणीत टाकले. तर काही षटकांच्या अंतरातच उपकर्णधार अजिंक्य रहाणे (५) एकेरी धाव चोरण्याच्या प्रयत्नात धावचीत झाला. त्यामुळे बिनबाद ९७ वरून भारताची ४ बाद ११२ धावा अशी घसरगुंडी झाली. राहुलने मात्र नऊ चौकारांसह कारकीर्दीतील १२वे अर्धशतक झळकावून एक बाजू लावून धरली.

संक्षिप्त धावफलक

इंग्लंड (पहिला डाव) : सर्व बाद १८३

भारत (पहिला डाव) : ४६.४ षटकांत ४ बाद १२५ (के. एल. राहुल खेळत आहे ५७, रोहित शर्मा ३६; जेम्स अँडरसन २/१५)

अँडरसनची कुंबळेशी बरोबरी

अँडरसनने भारताचा माजी फिरकीपटू अनिल कुंबळेच्या ६१९ कसोटी बळींची बरोबरी साधली. कोहलीला बाद करून अँडरसनने सर्वाधिक कसोटी बळी मिळवणाऱ्यांच्या यादीत तिसरा क्रमांक मिळवला. श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन (८०० बळी) आणि ऑस्ट्रेलियाचा शेन वॉर्न (७०८ बळी) हे फिरकीपटू या यादीत अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या स्थानी विराजमान आहेत. २००३मध्ये आंतरराष्ट्रीय कारकीर्दीला प्रारंभ करणाऱ्या अँडरसनने १६३ कसोटींमध्ये इंग्लंडचे प्रतिनिधित्व केले आहे.

आर्चर आयपीएल, ट्वेन्टी-२० विश्वचषकाला मुकणार

लंडन : इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर दुखापतीमुळे आगामी इंडियन प्रीमियर लीग, ट्वेन्टी-२० विश्वचषक आणि अ‍ॅशेस कसोटी मालिकेला मुकणार आहे. आर्चरच्या उजव्या हाताला दुखापत गंभीर दुखापत झाली असून त्याने आधीच भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतून माघार घेतली आहे. आर्चरला पूर्णपणे सावरून पुनरागमन करण्यासाठी किमान चार महिन्यांचा अवधी लागणार आहे.