Turning Point Of India vs England 2nd T20I: श्रेयस अय्यर भारतीय टी-२० संघाचा कर्णधार बनल्यानंतर भारतीय संघाला एकही टी-२० सामना जिंकता आलेला नाही. आयर्लंडविरुद्धच्या २ टी-२० सामन्यांमध्ये भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर इंग्लंडविरुद्धचा पहिला सामना पावसामुळे धुतला गेला होता. आता ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानावर पार पडलेल्या या सामन्यात भारतीय संघाला ४ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला आहे. या सामन्यात फिरकी गोलंदाज रवी बिश्नोईचं एक षटक भारतीय संघाला चांगलंच महागात पडलं.
बॅकफूट नो बॉलने टीम इंडियाला दिला दणका
भारतीय संघ विजयाच्या उंबरठ्यावर होता. भारतीय संघाने १९१ धावांचा बचाव करताना इंग्लंडच्या ५ फलंदाजांना पॅव्हेलियनची वाट दाखवली होती. पण १७ व्या षटकात इंग्लंडने दमदार पुनरागमन केलं आणि सामना भारतीय संघाकडून हिसकावून घेतला. श्रेयस अय्यरने १७ व्या षटकात चेंडू रवी बिश्नोईच्या हातात दिला. पण या षटकात २ बॅकफूट नो बॉल टाकले. गोलंदाजी करत असताना २ वेळा त्याचा पाय साईड साईनला टच झाला होता. त्यामुळे अंपायरने नो बॉल घोषित केला. फ्री हिटचा फायदा घेत इंग्लंडच्या फलंदाजांनी खणखणीत षटकार खेचले. त्याने या षटकात एकूण २९ धावा खर्च केल्या. त्यामुळे भारतीय संघाच्या हातात असलेला सामना इंग्लंडने हिसकावून घेतला. रवी बिश्नोईने या सामन्यातील ४ षटकात सर्वाधिक ६० धावा खर्च केल्या.
इंग्लंडकडून धावांचा यशस्वी पाठलाग
इंग्लंडला हा सामना जिंकण्यासाठी १९१ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना फिल सॉल्ट आणि जोस बटलर दोघेही शून्यावर माघारी परतले. दोघांना अर्शदीप सिंगने बाद करत माघारी धाडलं. त्यानंतर कर्णधार हॅरी ब्रुकने ३९ धावांचे योगदान दिले. टॉम बँटनने देखील ३९ धावा केल्या. विल जॅक्स ९ धावा करन माघारी परतला, तर सॅम करन देखी अवघ्या ७ धावा करुन माघारी परतला. पण जेकब बेथेल शेवटपर्यंत उभा राहिला आणि भारतीय संघाला पराभूत करण्यात मोलाची भूमिका बजावली. त्याने ४६ चेंडूंचा सामना करत ७६ धावांची खेळी केली.
भारतीय संघाकडून प्रथम फलंदाजी करताना पहिलाच सामना खेळत असलेला वैभव सूर्यवंशी १४ धावा करुन माघारी परतला. तर अभिषेक शर्माने ४३ धावांची दमदार खेळी केली. तर इशान किशनने ४९ धावांचे योगदान दिले. श्रेयस अय्यरने या डावात ३७ धावांची खेळी केली. तर तिलक वर्माने नाबाद २४ धावांची खेळी केली. भारतीय संघाने २० षटकांअखेर ७ गडी बाद १९० धावा केल्या.
