विशाखापट्टणम : पहिल्या कसोटीतील निराशाजनक कामगिरीनंतर दमदार पुनरागमनासाठी उत्सुक असलेल्या भारतीय संघाची आज, शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात युवकांवर भिस्त असेल. या सामन्यासाठी अंतिम ११ खेळाडूंची निवड करताना भारताला काही अवघड निर्णय घ्यावे लागणार आहेत. सर्फराज खान आणि रजत पाटीदार या नवोदित फलंदाजांपैकी कोणाला संधी मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच या दोघांनाही संघात स्थान देण्याचा पर्यायही भारताकडे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मायदेशात प्रतिस्पर्ध्यावर वर्चस्व गाजवणाऱ्या भारतीय संघाला हैदराबाद येथे झालेल्या पहिल्या कसोटीत इंग्लंडच्या ‘बॅझबॉल’ या आक्रमक आणि निडरपणे खेळण्याच्या प्रवृत्तीने निष्प्रभ केले. भारतीय संघाने पहिल्या डावात १९० धावांची मोठी आघाडी मिळवली होती. मात्र, दुसऱ्या डावात आधी भारताच्या गोलंदाजांनी निराशा केली, मग आघाडीच्या फलंदाजांनी इंग्लंडचा डावखुरा फिरकीपटू टॉम हार्टलीपुढे शरणागती पत्करली. तळाच्या फलंदाजांनी प्रतिकार करत भारताला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले नाही. भारताने हा सामना २८ धावांनी गमावला. त्यामुळे भारतीय संघ पाच सामन्यांच्या या मालिकेत ०-१ अशा फरकाने पिछाडीवर पडला आहे. या कसोटीदरम्यान रवींद्र जडेजा आणि केएल राहुल हे दोन प्रमुख खेळाडू जायबंदी झाले. त्यामुळे हे दोघे दुसऱ्या कसोटीला मुकणार असून भारतासमोर संघनिवडीचा पेच निर्माण झाला आहे.

हेही वाचा >>> इंग्लंडच्या आक्रमणाला प्रत्युत्तर देण्यासाठी नव्या योजनांसह सज्ज! दुसऱ्या कसोटीत भारतीय संघाच्या दमदार पुनरागमनाचा भरतला विश्वास

राहुल आणि जडेजा यांनी पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात अनुक्रमे ८६ आणि ८७ धावांची खेळी केली होती. तसेच जडेजाने दोन डावांत मिळून पाच गडीही बाद केले. त्यामुळे या दोघांची उणीव भरून काढणे हे अन्य खेळाडूंसमोरील मोठे आव्हान असणार आहे. त्यातच तारांकित फलंदाज विराट कोहली दुसऱ्या कसोटीसाठीही उपलब्ध नसल्याने भारतासमोरील आव्हान अधिकच वाढले आहे. राहुल आणि जडेजाच्या अनुपलब्धतेमुळे सर्फराज आणि पाटीदार या फलंदाजांसह डावखुरा फिरकीपटू सौरभ कुमार आणि अष्टपैलू वॉिशग्टन सुंदर यांना भारतीय चमूत स्थान देण्यात आले आहे. आता या चौघांपैकी कोणाला संधी मिळते याकडे सर्वांचे लक्ष असेल.

पाटीदार पहिल्या कसोटीसाठीही भारतीय चमूत होता. त्यामुळे दुसऱ्या कसोटीत राहुलची जागा घेण्यासाठी सध्या पाटीदारचे पारडे जड मानले जात आहे. पहिल्या कसोटीत इंग्लंडसाठी ऑली पोपने दुसऱ्या डावात १९६ धावांची निर्णायक खेळी केली होती. त्याने ‘स्विप’ आणि ‘रिव्हर्स स्विप’च्या फटक्यांचा खुबीने वापर केला होता. पाटीदार हा फटका मारण्यात पटाईत आहे. ३० वर्षीय पाटीदारने आतापर्यंत ५५ प्रथमश्रेणी सामन्यांत ४५.९७च्या सरासरीने ४००० धावा केल्या असून यात १२ शतके आणि २२ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने कसोटी मालिकेपूर्वी भारत-अ संघाकडून खेळताना इंग्लंड लायन्सविरुद्ध १५१ धावांची खेळी केली होती. त्यामुळे तो लयीत असून याचा भारताला नक्कीच फायदा होऊ शकेल.

हेही वाचा >>> Ind vs Eng: शोएब बशीरला पदार्पणाची संधी; ४१वर्षीय जेम्स अँडरसनही खेळणार

२६ वर्षीय मुंबईकर सर्फराजने आतापर्यंत ४५ प्रथमश्रेणी सामन्यांत तब्बल ६९.८५च्या सरासरीने ३९१२ धावा केल्या आहेत. भारतीय कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी त्याला बराच काळ वाट पाहावी लागली. आता ही प्रतीक्षा संपली असली, तरी त्याला कसोटी सामना खेळण्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागू शकेल. शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर यांच्यापैकी एकाला वगळण्याचा निर्णय झाला, तरच सर्फराजला संधी मिळू शकते.

दुसरीकडे, पहिल्या डावातील मोठी पिछाडी भरून काढत भारताला मायदेशात पराभूत करण्याची किमया साधणाऱ्या इंग्लंडचा प्रयत्न कामगिरीत सातत्य राखण्याचा असेल. पोपचा अपवाद वगळता इंग्लंडच्या आघाडीच्या फळीतील फलंदाजांना पहिल्या कसोटीत मोठी खेळी करता आली नाही. यात बदल करण्यासाठी इंग्लंडचे फलंदाज उत्सुक असतील.

जडेजाच्या जागी कुलदीप?

विशाखापट्टणम येथील स्टेडियमची खेळपट्टी फिरकीला अनुकूल असणे अपेक्षित आहे. त्यामुळे भारतीय संघ या कसोटीत तीन किंवा इंग्लंडचे अनुकरण करताना चार फिरकीपटूंसह खेळण्याची शक्यता आहे. पहिल्या कसोटीत रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल आणि जडेजा यांनी फिरकीची धुरा सांभाळली होती. जडेजा दुसऱ्या कसोटीला मुकणार असल्याने त्याची जागा घेण्यासाठी ‘चायनामन’ फिरकीपटू कुलदीप यादव, ऑफ-स्पिनर वॉशिंग्टन सुंदर आणि डावखुरा फिरकीपटू सौरभ कुमार यांच्यामध्ये चुरस आहे. सध्या या शर्यतीत कुलदीप आघाडीवर आहे. तसेच भारताने मोहम्मद सिराजला वगळण्याचा निर्णय घेतल्यास सुंदर आणि सौरभपैकी एकालाही संधी मिळू शकेल.

गिल, अय्यरचे स्थान सुरक्षित?

शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर यांनी पहिल्या कसोटी सामन्यात निराशा केली. त्यांना गेल्या काही काळात कसोटी क्रिकेटमध्ये धावांसाठी झगडावे लागले आहे. मात्र, राहुल आणि कोहली या अनुभवी फलंदाजांच्या अनुपस्थितीत भारतीय संघ एकाच वेळी पाटीदार आणि सर्फराज या दोन पदार्पणवीरांना संधी देण्याची शक्यता कमी आहे. अशात गिल आणि अय्यर यांचे स्थान किमान दुसऱ्या कसोटीपुरते सुरक्षित मानले जात आहे.

शोएब बशीरचे पदार्पण

‘व्हिसा’ विलंबामुळे पहिल्या कसोटीला मुकलेल्या शोएब बशीरला दुसऱ्या कसोटीत पदार्पणाची संधी मिळणार आहे. या सामन्यासाठी इंग्लंडच्या संघात दोन बदल करण्यात आले आहेत. डावखुरा फिरकीपटू जॅक लिच दुखापतीमुळे या सामन्याला मुकणार असून वेगवान गोलंदाज मार्क वूडलाही संघाबाहेर करण्यात आले आहे. त्यांची जागा ऑफ-स्पिनर बशीर आणि वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन घेणार आहेत.

संघ

* भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, श्रेयस अय्यर, केएस भरत (यष्टिरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टिरक्षक), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमरा (उपकर्णधार), मुकेश कुमार, आवेश खान, रजत पाटीदार, सर्फराज खान, वॉशिंग्टन सुंदर, सौरभ कुमार.

* इंग्लंड (अंतिम ११) : बेन स्टोक्स (कर्णधार), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स (यष्टिरक्षक), जेम्स अँडरसन, रेहान अहमद, टॉम हार्टली, शोएब बशीर. * वेळ : सकाळी ९.३० वा. ’ थेट प्रक्षेपण : स्पोर्ट्स १८, जिओ सिनेमा 

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India vs england 2nd test playing xi rajat patidar sarfaraz khan likely to make debut zws
First published on: 02-02-2024 at 02:42 IST