Ind vs Eng 2nd Test Weather Prediction: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. मालिकेतील दुसरा सामना बर्मिंघममध्ये रंगणार आहे. या सामन्याला २ जुलैपासून सुरु होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी ३:३० वाजता सुरू होईल. या मालिकेतील पहिला सामना लीड्सच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे भारतीय संघ हा सामना जिंकून मालिकेत कमबॅक करण्याच्या प्रयत्नात असणार आहे.
लीड्सच्या मैदानावर पार पडलेल्या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडसमोर विजयासाठी ३७१ धावांचे आव्हान ठेवले होते. इंग्लंडने शेवटच्या दिवशी ३५० धावांचा यशस्वी पाठलाग केला आणि सामना जिंकला. या सामन्यात भारतीय गोलंदाजांना आपली छाप सोडता आली नाही. त्यामुळे भारतीय संघ आता बर्मिंघम कसोटी जिंकण्याच्या प्रयत्नात असणार आहे.
बर्मिंघम कसोटी दरम्यान कसं असेल हवामान?
इंग्लंडमध्ये पावसामुळे सामन्यात व्यत्यय येणं काही नवीन नाही. बऱ्याचदा पावासामुळे सामन्यात अडथळा निर्माण झाला आहे. लीड्स कसोटीतही पावसाने हजेरी लावली होती. मात्र, याचा सामन्यावर फार परिणाम झाला नाही. दुसऱ्या कसोटीआधी दोन्ही संघांसाठी टेन्शन वाढवणारी बातमी समोर येत आहे. कारण या सामन्यातही पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
अॅक्यूवेदरने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, सामन्यातील ५ पैकी ३ दिवस पाऊस हजेरी लावू शकतो. सामन्यातील पहिला दिवस म्हणजे २ जुलैला पाऊस पडण्याची शक्यता ८४ टक्के इतकी असणार आहे. तर सामन्याच्या चौथ्या दिवशी म्हणजे ५ जुलैला आणि शेवटच्या दिवशी म्हणजे ६ जुलैला पाऊस पडण्याची शक्यता ही ६०-६० टक्के इतकी असणार आहे. सामन्यातील दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी पाऊस पडणार नाही, मात्र ढगाळ वातावरण असेल.
भारतीय संघाचा कसून सराव
या सामन्यात जसप्रीत बुमराहला विश्रांती दिली जाणार असल्याची चर्चा रंगली आहे. तर भारतीय संघ २ फिरकी गोलंदाजांसह मैदानात उतरू शकतो. माध्यमातील वृत्तानुसार, आकाश दीप, अर्शदीप सिंग, नितीश कुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर यांना दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघाच्या प्लेइंग ११ मध्ये स्थान दिले जाऊ शकते.