इंग्लंडविरुद्धची दुसरी ट्वेन्टी-२० लढत आजऋषभ पंत आणि अमित मिश्राला संधी मिळण्याची शक्यता

ट्वेन्टी-२० हा क्रिकेटचा प्रकार फक्त हवेत फटके मारण्यासाठी नाही, या गोष्टीचा अवलंब भारताने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात केल्यास त्यांना ही लढत जिंकता येऊ शकते. पहिल्या ट्वेन्टी-२० लढतीत भारतीय संघाने हवेत फटके मारण्याच्या नादात आपले फलंदाज गमावले. त्यामुळे त्यांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही आणि पराभव पदरी पडला. त्यामुळे हा सामना जिंकून मालिका वाचवण्याचे आव्हान भारतापुढे या लढतीत असेल. दुसरीकडे ही लढत जिंकून तीन ट्वेन्टी-२० सामन्यांच्या मालिकेत विजयी आघाडी घेण्यासाठी इंग्लंडचा संघ प्रयत्नशील असेल.

कर्णधार विराट कोहलीने पहिल्या लढतीत सलामीला येत आपण कोणत्याही स्थानावर खेळू शकतो, हे दाखवून दिले आहे. त्याने सलामीला येताना चांगले फटके मारले, पण त्याला मोठी खेळी साकारता आली नाही. सलामीवीर लोकेश राहुल हा चांगल्या फॉर्मात दिसत नाही, त्यामुळे या सामन्यात सलामीला मनीष पांडे किंवा अन्य एका फलंदाजाला संधी देण्याचा प्रयोग केला जाऊ शकतो. संघात पुनरागमन केलेला सुरैश रैना पहिल्या सामन्यात चांगल्या फॉर्मात दिसला. त्याचबरोबर महेंद्रसिंग धोनीने संयतपणे फलंदाजी करत अजूनही आपण संघाला सावरू शकतो, हे पहिल्या सामन्यात दाखवून दिले. दुसऱ्या सामन्यात युवराज सिंगकडून संघाला मोठय़ा अपेक्षा असतील. पहिल्या सामन्यात भारताच्या एकाही गोलंदाजाला भेदक मारा करता आला नाही. त्यामुळे या सामन्यासाठी गोलंदाजांना अधिक मेहनत करावी लागणार आहे.

पहिल्या ट्वेन्टी-२० लढतीत इंग्लंडने सरस खेळ केला होता. ईऑन मॉर्गन हा चाणाक्ष कर्णधार आहेच, पण ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये त्याची फलंदाजी अधिक बहरताना दिसते. जो रूट हा सातत्याने धावा करताना दिसत आहे. सलामीवीर सॅम बिलिंग्स आणि जेसन रॉय यांच्याकडून संघाला मोठय़ा अपेक्षा आहेत. अष्टपैलू मोईन अली हा दमदार कामगिरी करत आहे. त्याचबरोबर बेन स्टोक्स आणि लिआम प्लंकेट यांच्याकडे कोणत्याही क्षणी सामना फिरवण्याची कुवत आहे. इंग्लंडच्या संघात सर्वात जास्त अष्टपैलू खेळाडू आहेत आणि हेच त्यांचे बलस्थान आहे. त्यामुळे फक्त दोन गोलंदाजांसह ते सामन्यात उतरू शकतात. अली, स्टोक्स आणि प्लंकेट हे तिन्ही अष्टपैलू खेळाडू आपली निर्धारित षटके यशस्वीरीत्या टाकताना दिसत आहेत. पण फलंदाजीमध्ये ते संघासाठी किती योगदान करतात, हे पाहणे उत्सुकतेचे असेल.

व्हीसीए मोठे स्टेडियम आहे. अशा मोठय़ा स्टेडियममध्ये गोलंदाजांकडे चेंडूला उंची देण्याची संधी अधिक असते. त्यामुळे फलंदाजाला गुंगारा देता येऊ शकतो. कोणत्या चेंडूवर फटका मारायचा व कोणते चेंडू सोडायचे, याविषयी फलंदाजही संभ्रमात असतो.  यझुवेंद्र चहल, भारतीय फिरकीपटू

प्रतिस्पर्धी संघ

  • भारत : विराट कोहली (कर्णधार), जसप्रीत बुमराह, यझुवेंद्र चहल, महेंद्रसिंग धोनी, भुवनेश्वर कुमार, मनदीप सिंग, अमित मिश्रा, आशीष नेहरा, मनीष पांडे, हार्दिक पंडय़ा, ऋषभ पंत, परवेझ रसूल, लोकेश राहुल, युवराज सिंग, सुरेश रैना.
  • इंग्लंड : ईऑन मॉर्गन (कर्णधार), मोईन अली, जेक बॉल, सॅम बिलिंग्ज, जोस बटलर, लियाम डॉसन, जॉनी बेअरस्टो, ख्रिस जॉर्डन, टायमल मिल्स, लियाम प्लंकेट, आदिल रशीद, जो रूट, जेसन रॉय, बेन स्टोक्स, डेव्हिड विली.
  • थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स वाहिन्यांवर
  • वेळ : संध्याकाळी ७ वाजल्यापासून