पीटीआय, बर्मिगहॅम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

करोनामुळे गतवर्षी ‘प्रलंबित’ राहिलेल्या पाचव्या कसोटी सामन्याचा निकाल अखेरीस इंग्लंडच्या बाजूने लागला. त्यामुळे २००७नंतर प्रथमच इंग्लंडच्या भूमीवर मालिका जिंकून पतौडी करंडक उंचावण्याचे भारताचे स्वप्न मंगळवारी धुळीस मिळाले. जो रूट आणि जॉनी बेअरस्टो यांच्या शानदार नाबाद शतकांमुळे इंग्लंडला आव्हानात्मक धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करता आला. इंग्लंडने हा सामना सात गडी राखून जिंकत मालिका २-२ अशी बरोबरीत राखली.

भारताने विजयासाठी दिलेल्या ३७८ धावसंख्येचा पाठलाग करताना सोमवारी चौथ्या दिवशीच इंग्लंडने ३ बाद २५९ अशी मजल मारत आपले वर्चस्व सिद्ध केले होते. मंगळवारी पाचव्या आणि अखेरच्या दिवशी रूट-बेअरस्टो जोडीने फक्त दीड तासांत १९.४ षटकांत आवश्यक ११९ धावा केल्या. रूट आणि बेअरस्टो यांनी आपापली शतके झळकावत नाबाद २६९ धावांच्या भागीदारीसह इंग्लंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. रूटने १७३ चेंडूंत १९ चौकार आणि एका षटकारासह नाबाद १४२ धावा केल्या, तर बेअरस्टोने १४५ चेंडूंत १५ चौकार आणि एका षटकारासह नाबाद ११४ धावा केल्या. बेअरस्टोचे या सामन्यातील हे दुसरे शतक ठरले. त्याने इंग्लंडच्या पहिल्या डावातही १०६ धावा केल्या होत्या. बेअरस्टोला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले, तर मालिकावीर पुरस्कार रूट आणि जसप्रित बुमरा यांना विभागून देण्यात आला.

इंग्लंडने न्यूझीलंडविरुद्ध तीन आणि भारताविरुद्ध एक असे एकूण चार कसोटी सामने सलग जिंकले. गेल्या आठ डावांत रूटने ११, नाबाद ११५, १७६, ३, ५, नाबाद ८६, ५, नाबाद १४२ धावा केल्या आहेत. तर बेअरस्टोने १, १६, ८ ,१३६, १६२, नाबाद ७१, १०६, नाबाद ११४ धावा केल्या आहेत.

इंग्लंडला पहिल्या डावात फक्त २८४ धावांत रोखणाऱ्या भारतीय गोलंदाजांना मंगळवारी अखेरच्या सत्रात कोणतेही यश मिळाले नाही. इंग्लंडच्या दुसऱ्या डावात फक्त कर्णधार बुमरालाच दोन बळी मिळाले. या सामन्यात बुमराने एकूण पाच बळी मिळवले. या पराभवामुळे जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या गुणतालिकेत अव्वल दोन स्थान मिळवण्याच्या भारताच्या आशांना धक्का बसला आहे.

संक्षिप्त धावफलक

’ भारत (पहिला डाव) : ४१६

’ इंग्लंड (पहिला डाव) : २८४

’ भारत (दुसरा डाव) : २४५

’ इंग्लंड (दुसरा डाव) : ७६.४ षटकांत ३ बाद ३७८ (जो रूट नाबाद १४२, जॉनी बेअरस्टो नाबाद ११४; जसप्रित बुमरा २/७४)

’ सामनावीर : जॉनी बेअरस्टो

’ मालिकावीर : जो रूट, जसप्रित बुमरा

भारताला आर्थिक आणि दोन गुणांचा दंड

दुबई : इंग्लंडविरुद्ध पाचव्या कसोटी सामन्यात षटकांची गती धिमी राखल्याबद्दल भारतीय संघाला फटका बसला. भारतीय खेळाडूंच्या सामन्याच्या मानधनापैकी ४० टक्के रक्कम दंड ठोठावण्यात आला आहे. याचप्रमाणे ‘आयसीसी’ जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या गुणतालिकेत भारताच्या खात्यातून दोन गुण वजा केले आहेत. अपेक्षित वेळेत दोन षटके कमी टाकल्यामुळे ‘आयसीसी’चे सामनाधिकारी डेव्हिड बून यांनी भारतीय संघाला ही शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे भारताची ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान यांच्यानंतर चौथ्या क्रमांकावर घसरण झाली आहे.

फलंदाजांच्या कामगिरीचे पुनरावलोकन गरजेचे -द्रविड

कसोटी सामन्यांच्या तिसऱ्या डावातील भारतीय फलंदाजांचे अपयश हा चिंतेचा विषय असून त्यांच्या कामगिरीचे पुनरावलोकन गरजेचे आहे, असे मत भारताचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने व्यक्त केले. गेल्या तीन कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघ तिसऱ्या डावात अनुक्रमे २६६, १९८ आणि २४५ धावांत गारद झाला आहे. ‘‘आम्ही सातत्याने सामने खेळत असल्याने मागील कामगिरीबाबत विचार करण्यासाठी फारसा वेळ उपलब्ध होत नाही. मात्र, आम्हाला या कामगिरीचे पुनरावलोकन करावे लागणार आहे. प्रत्येक सामन्यात तुम्हाला काहीतरी शिकायला मिळते. या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या डावात आमच्या फलंदाजांना मोठय़ा खेळी करण्यात का अपयश आले आणि चौथ्या डावात आम्ही १० गडी का बाद करू शकलो नाही, याबाबत आम्ही विचार करणे गरजेचे आहे,’’ असे द्रविड म्हणाला. तसेच खेळपट्टीवर अतिरिक्त गवत असल्याने भारताने या कसोटीत रविचंद्रन अश्विनच्या रूपात अतिरिक्त फिरकीपटू खेळवला नाही, असेही द्रविडने स्पष्ट केले.

भारतीय चाहत्यांवरील वर्णभेदी टिप्पणीची चौकशी

बर्मिगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील बर्मिगहॅम येथे झालेल्या पाचव्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी काही भारतीय चाहत्यांवर वर्णभेदी टिप्पणी झाल्याच्या आरोपांची चौकशी करण्यात येत असल्याची माहिती इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळ (ईसीबी) व वॉर्विकशायर कौंटी क्रिकेट क्लबकडून मंगळवारी देण्यात आली. एजबॅस्टन मैदानावर झालेल्या या कसोटीच्या चौथ्या दिवशी काही ब्रिटिश चाहत्यांनी आपल्याला वर्णभेदी टोमणे मारल्याचा दावा काही भारतीय चाहत्यांनी ‘ट्विटर’च्या माध्यमातून केला. यॉर्कशायर कौंटी संघाचा माजी क्रिकेटपटू अझीम रफिकने यापैकी काही ‘ट्वीट’ आपल्या खात्यावरून ‘री-ट्वीट’ केले. त्याची दखल एजबॅस्टन मैदानाकडून घेण्यात आली. ‘‘हे अत्यंत खेदजनक असून अशा प्रकारचे वर्तन कधीही खपवून घेतले जाऊ शकत नाही. आम्ही लवकरात लवकर याची चौकशी करू,’’ असे एजबॅस्टन मैदानाच्या अधिकृत ‘ट्विटर’ खात्यावर म्हटले आहे.

कसोटी क्रिकेटची हीच खास गोष्ट आहे. तुम्ही तीन दिवस वर्चस्व गाजवल्यानंतरही सामना जिंकणार याची खात्री नसते. तुम्हाला पाचही दिवस सर्वोत्तम खेळ करावा लागतो. या सामन्याच्या चौथ्या दिवशी आम्ही फलंदाजीत कमी पडलो आणि प्रतिस्पर्धी संघाला पुनरागमनाची संधी मिळाली. त्यानंतर सामना आमच्या हातून निसटत गेला.  

जसप्रित बुमरा, भारताचा कर्णधार

भारतीय संघाला बऱ्याच गोष्टींचा विचार करावा लागणार आहे. अव्वल सहा फलंदाजांपैकी केवळ चेतेश्वर पुजारा आणि ऋषभ पंत धावा करत आहेत. रवींद्र जडेजाही अप्रतिम फलंदाजी करतो आहे. परंतु अन्य फलंदाजांना सूर गवसणे गरजेचे आहे. चौथ्या डावात भारतीय गोलंदाजांनीही निराशा केली.   

वीरेंद्र सेहवागमाजी क्रिकेटपटू

इंग्लंडने सलग चौथ्यांदा २५०हून अधिक धावसंख्येचा पाठलाग यशस्वीपणे साध्य केला. गेल्या महिन्यात न्यूझीलंडविरुद्धच्या ३-० अशा मालिका विजयात इंग्लंडने २७८, २९९ आणि २९६ या लक्ष्यांचा यशस्वी पाठलाग केला होता.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India vs england 5th test england beat india by 7 wickets zws
First published on: 06-07-2022 at 04:52 IST