IND vs ENG 5th Test Score Updates, 5th July 2022 : पाच सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना १ जुलैपासून बर्मिंगहॅममधील एजबस्टन क्रिकेट स्टेडियमवरती खेळवला गेला. यजमान इंग्लंडने हा सामना सात गडी राखून जिंकला. आज पाचव्या दिवशी इंग्लंडला विजयासाठी ११९ धावांची तर भारताला सात बळींची आवश्यकता होती. भारताने दुसऱ्या डावात सर्वबाद २४५ धावा केल्या होत्या. त्यामुळे भारताकडे ३७७ धावांची आघाडी आली होती. मात्र, इंग्लंडच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी करत विजय मिळवला. पाचवा सामना इंग्लंडने जिंकल्यामुळे मालिका २-२ अशी बरोबरी सुटली आहे. ऋषभ पंतच्या १४६ धावा आणि रविंद्र जडेजाच्या नाबाद ८३ धावांच्या बळावर पहिल्या दिवसअखेर भारतीय संघाने सात बाद ३३८ धावांपर्यंत मजल मारली होती. दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाल्यानंतर रविंद्र जडेजाने आपल्या कसोटी कारकिर्दीतील तिसरे शतक पूर्ण केले. भारतीय संघाने पहिल्या डावात सर्वबाद ४१६ धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या यजमान इंग्लंडला सर्वबाद २८४ धावांपर्यंत मजल मारता आली. आपल्या पहिल्या डावात इंग्लंडची फलंदाजी सपशेल ढेपाळली होती मात्र, जॉनी बेअरस्टोच्या शतकी खेळीमुळे त्यांना फॉलोऑन टाळण्यात यश आले. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडची फलंदाजी सुरू झाल्यानंतर पावसाने तीनदा व्यत्यय आणला होता. त्यामुळे दिवसभरातील बहुतेक खेळ होऊ शकल नाही. दरम्यान, भारतीय गोलंदाजांच्या टिच्चून माऱ्यासमोर इंग्लंडचे फलंदाज जास्त काळ तग धरू शकले नाही. सामन्याचा दुसरा दिवस भारतीय कर्णधार जसप्रीत बुमराहच्या नावे राहिला. बुमराहने फलंदाजी करताना कसोटीतील एकाच षटकात सर्वाधिक धावा फटकावण्याचा विश्वविक्रम केला. त्याने स्टुअर्ट ब्रॉडच्या षटकामध्ये ३५ धावा मिळवल्या. शिवाय, गोलंदाजी करताना बुमराहने तीन गडी बाद केले. त्यापूर्वी, पहिल्या दिवशी इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे भारतीय संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला. मात्र, भारतीय डावाची सुरुवात फारच वाईट झाली. भारताचे पहिले पाच फलंदाज १०० धावांच्या आतच तंबूत परतले होते. अशा स्थितीमध्ये उपकर्णधार ऋषभ पंत आणि रविंद्र जडेजाने संयमी खेळी करत डाव सावरला. दोघांनी सहाव्या गड्यासाठी २२२ धावांची भागीदारी केली. पहिल्या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला तेव्हा रविंद्र जडेजा ८३ धावांवर तर मोहम्मद शामी खातेही न खोलता नाबाद होते.