सातत्यपूर्ण फलंदाजी करणारा मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवसाठी अखेर भारतीय संघाचे दरवाजे उघडले आहेत. इंग्लंड विरुद्धच्या पाच टी २० सामन्यांसाठी सूर्यकुमारची भारतीय संघात निवड झाली आहे. टी-२० संघात निवड झाल्याबद्दल आनंद व्यक्त करताना सूर्यकुमार यादवने कर्णधार विराट कोहलीबद्दलचा आदर व्यक्त केला आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणे, हे माझे स्वप्न होते असे सूर्यकुमारने म्हटले आहे.

विराट कोहलीकडून शिकण्यासाठी आणि खेळाडू म्हणून स्वत:ला आणखी समृद्ध करण्यासाठी उत्सुक असल्याचे सूर्यकुमारने म्हटले आहे. आयपीएल २०२० मध्ये बंगळुरु विरुद्धच्या सामन्यात मैदानावर कर्णधार विराट कोहलीला दिलेल्या प्रत्युत्तरानंतर, तो चर्चेत आला होता.

सूर्यकुमार यादवने मागच्या काही वर्षात मुंबईत इंडियन्सकडून खेळताना सातत्यपूर्ण प्रदर्शन केले आहे. मुंबईला आयपीएलचे पाचवे जेतेपद मिळवून देण्यात त्याची महत्त्वाची भूमिका होती. आयपीएल २०२० मध्ये त्याची सरासरी ४०.२२ होती. पण स्ट्राइक रेट १५५.३६ इतका हाय होता.

“सर्वात पहिलं म्हणजे मला संघासोबत चांगला वेळ घालवायचा आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणे हे माझे बऱ्याच काळापासूनचे स्वप्न होते. त्यामुळे मी लवकरात लवकर विराटकडून शिकण्यासाठी उत्सुक्त आहे. त्यामुळे खेळाडू म्हणून माझ्यात आणखी सुधारणा होईल” असे सूर्यकुमार बीसीसीआयशी बोलताना म्हणाला.

“आयपीएलमध्ये मी विराट कोहली विरोधात खेळलो आहे. भारतासाठी ऐवढे मिळवल्यानंतरही मैदानावर त्याच्यामध्ये जी ऊर्जा असेत, ते कौतुकास्पद आहे. जिंकण्यासाठी खेळण्याची, त्याची जी प्रवृत्ती आहे, त्यातून बरचं काही शिकण्यासारखं आहे” असे सूर्यकुमार म्हणाला.