लंडनच्या ओव्हल मैदानावर गुरुवारी सुरू असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीसाठी भारताने आपल्या प्लेईंग इलेव्हनमध्ये काही बदल केले. नाणेफेक करताना कर्णधार विराट कोहलीने वेगवान गोलंदाज उमेश यादव आणि शार्दुल ठाकूर अंतिम ११ खेळाडूंमध्ये संधी देण्यात आली आहे आणि त्यांनी इशांत शर्मा आणि मोहम्मद शमीची जागा घेतल्याचे सांगितले. त्याचबरोबर इंग्लंड संघाने जोस बटलर आणि सॅम करनच्या जागी ओली पोप आणि ख्रिस वोक्स यांना संधी दिली आहे.

लीड्स कसोटी गमावल्यानंतर भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथी कसोटी आजपासून सुरू झाली आहे. पाच सामन्यांची मालिका सध्या १-१ने बरोबरीत आहे. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जो रूटने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ईशांत आणि शमीला अनफिट असल्यामुळे संघात स्थान मिळवता आलेले नाही. त्याचबरोबर फिरकीपटू रवीचंद्रन अश्विन पुन्हा एकदा संघात स्थान मिळवण्यात अपयशी ठरला आहे. सामना सुरू होण्यापूर्वी अश्विनचा संघात समावेश केल्याची चर्चा होती. रवींद्र जडेजाच्या जागी त्याला संघात समाविष्ट केले जाऊ शकते असे सांगितले जात होते, पण कर्णधार विराट कोहलीने नाणेफेकी दरम्यान या चर्चेला पूर्णविराम दिला.

“आम्ही प्रथम गोलंदाजी केली असती पण नाणेफेक ही अशी गोष्ट नाही जी तुम्ही नियंत्रित करू शकता. दोन्हीसाठी तयार असणे आवश्यक आहे. आम्ही धावा करण्यास उत्सुक आहोत, ” असे कोहलीने नाणेफेक करताना सांगितले.

IND vs ENG: कोहलीविरुद्धच्या खास सेलिब्रेशनचा अर्थ काय?; जेम्स अँडरसनने केला खुलासा

अश्विनला संघात समाविष्ट न करण्याच्या प्रश्नावर कोहलीने उत्तर दिले. “इंग्लंडकडे चार डावखुरे फलंदाज आहेत, त्यामुळे जडेजाला चांगली संधी आहे. आमच्या वेगवान गोलंदाजांनी विकेटवर गोलंदाजी केली आहे. या दौऱ्यावर काही दिवस शिल्लक आहेत आणि प्रयत्नांची कमतरता नक्कीच नाही,” असे विराटने म्हटले. इंग्लंडच्या संघात रोरी बर्न्स, डेव्हिड मलान, मोईन अली आणि जेम्स अँडरसन हे चार डावखुरे फलंदाज आहेत.

दरम्यान, अश्विनने येथे ११ कसोटी सामने खेळले आहेत आणि २८.११च्या सरासरीने १८ विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्या २०१८च्या दौऱ्यादरम्यान, आर. अश्विनने ४ कसोटी सामन्यांमध्ये एकूण ११ विकेट्स घेतल्या, तर २०१४ च्या दौऱ्यात त्याने २ सामन्यांमध्ये ३ विकेट्स घेतल्या. गोलंदाजी व्यतिरिक्त अश्विनच्या फलंदाजीमध्ये गेल्या काही काळात खूप सुधारणा झाली आहे जी कसोटी सामन्यांमध्ये खूप फायदेशीर ठरली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये केलेल्या कामगिरीने त्याने आश्चर्यचकित केले होते.

दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन

भारत : रोहित शर्मा, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

इंग्लंड : रोरी बर्न्स, हसीब हमीद, डेव्हिड मलान, जो रूट (कर्णधार), ओली पोप, जॉनी बेअरस्टो (यष्टीरक्षक), मोईन अली, ख्रिस वोक्स, क्रेग ओव्हर्टन, ओली रॉबिन्सन, जेम्स अँडरसन.