India vs England Semi Final Pitch Report:आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील पहिल्या सेमी फायनलमध्ये दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा एकतर्फी पराभव करून स्पर्धेतील अंतिम फेरीत स्थान मिळवलं आहे. तर दुसऱ्या सेमी फायनलमध्ये भारत आणि इंग्लंड हे दोन्ही संघ भिडणार आहेत. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. भारतीय संघाने साखळी फेरीतील सर्व सामने जिंकले होते. तर सुपर ८ फेरीत भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर भारताने एकही सामना गमावलेला नाही. आता भारतीय संघ सेमी फायनल जिंकून फायनलमध्ये प्रवेश करण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

तर दुसरीकडे इंग्लंडने सुपर ८ फेरीतील सर्व सामने जिंकून सेमी फायनलमध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे. दोन्ही संघांमध्ये एकापेक्षा एक स्टार खेळाडू आहेत. त्यामुळे फायनलमध्ये स्थान मिळवण्यासाठी दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळू शकते.

खेळपट्टी कोणाला साथ देणार?

वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी ही फलंदाजांसाठी नेहमीच फायदेशीर ठरते. दोन्ही संघातील सलामीवीर फलंदाज आपल्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखले जातात. जे चांगली सुरुवात करून देऊ शकतात. फलंदाजांसह वेगवान गोलदाजांनीही चांगलीच मदत मिळते. लाल मातीची खेळपट्टी असल्याने चेंडूला उसळी मिळते. पावरप्लेमध्ये वेगवान गोलंदाज फलंदाजांना अडचणीत आणू शकतात.

पण खेळ जसजसा पुढे जाईल, तसं फिरकी गोलंदाजांना मदत मिळणं सुरू होईल. मधल्या षटकांमध्ये फिरकी गोलंदाजांची भूमिका महत्वाची ठरेल. असं असलं तरीदेखील या मैदानावर २०० धावा करणं मोठी गोष्ट नाही. पहिल्या डावात इथे २०० धावा होऊ शकतात. या धावांचा यशस्वी पाठलाग देखील केला जाऊ शकतो. या हाय स्कोअरिंग सामन्यात जो संघ प्रेशर हाताळण्यात यशस्वी ठरेल. तोच संघ सामना जिंकू शकतो. कारण सेमी फायनलच्या सामन्यात दबाव दोन्ही संघांवर असतो.