India vs England Semi Final: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये थरारक सामना पाहायला मिळाला. टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील दुसऱ्या सेमी फायनलचा सामना भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये पार पडला. दोन्ही संघांनी आतापर्यंत दमदार कामगिरी केली होती. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये हाय व्हॉल्टेज सामना पाहायला मिळणार हे तर निश्चित होतं. पण सामन्याचा शेवट असा होईल, असा कोणी विचारही केला नसेल. भारतीय संघाने इंग्लंडसमोर विजयासाठी २५४ धावांचे मोठे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडने हा सामना अवघ्या ७ धावांनी गमावला. तर गौतम गंभीर आणि सूर्यकुमार यादवने मिळून घेतलेले २ निर्णय इंग्लंडवर भारी पडले.

शिवम दुबेला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवणं

या सामन्यात फलंदाजी करत असताना भारतीय संघाने फलंदाजीक्रमात आवश्यक बदल केले. इंग्लंडकडून लेग स्पिनर आदिल रशीद गोलंदाजी करण्यासाठी आला होता. त्यावेळी गंभीरने शिवम दुबेला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवण्याचा निर्णय घेतला. कारण गंभीरला माहीत होतं की, शिवम दुबे फिरकी गोलंदाजांविरूद्ध चांगली फलंदाजी करतो. त्यात लेग स्पिनर असेल, तर सोन्याहून पिवळं. याआधी नेदरलँड्स विरूद्ध झालेल्या सामन्यातही चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन त्याने ६६ धावांची खेळी केली होती. या सामन्यात त्याने सामनावीर पुरस्कार पटकावला होता. आता इंग्लंडविरूद्धच्या सामन्यातही तो ४३ धावांवर धावबाद होऊन माघारी परतला. त्याने आदिल रशीदच्या गोलंदाजीवर तुफान फटकेबाजी केली.

तिलक वर्मा सातव्या क्रमांकावर

आतापर्यंत झालेल्या सर्व सामन्यांमध्ये तिलक वर्माला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवण्यात आलं होतं. पण या सामन्यात त्याला ७ व्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवण्यात आलं. तिलक वर्मा इतक्या खालच्या क्रमांकावर फलंदाजीला येण्याची ही पहिलीच वेळ असावी. पण हा निर्णय भारतीय संघासाठी हिताचा ठरला. कारण भारतीय संघाला शेवटी असा फलंदाज हवा होता, जो पहिल्या चेंडूपाहून मोठे फटके खेळू शकतो. तिलकने असंच काहीसं केलं. त्याने ७ चेंडूत २१ धावा कुटल्या. भारतीय संघाने हा सामना अवघ्या ७ धावांनी आपल्या नावावर केला. जर तिलकने ही खेळी केली नसती, तर सामन्याचा निकाल वेगळा लागू शकला असता.

भारतीय संघाचा विजय

या सामन्यात इंग्लंडच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाने २० षटकांअखेर ७ गडी बाद २५३ धावा केल्या. भारताकडून संजू सॅमसनने सर्वाधिक ८९ धावांची खेळी केली. इंग्लंडला हा सामना जिंकण्यासाठी २५४ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना जेकब बेथेलने सर्वाधिक १०५ धावांची खेळी केली. पण इंग्लंडचा संघ विजयापासून अवघ्या ७ धावा दूर राहिला.