मुंबई : ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा तिसऱ्यांदा जिंकून इतिहास घडविण्यासाठी प्रयत्नशील असलेले भारत आणि इंग्लंड हे तुल्यबळ संघ उपांत्य फेरीत आज, गुरुवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आमनेसामने येणार असून यावेळी अष्टपैलू खेळाडूंमधील द्वंद्व निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ मायदेशातील ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत प्रतिस्पर्धांवर वर्चस्व गाजवेल अशी अपेक्षा बाळगली जात होती. मात्र, प्रत्यक्षात भारताला अद्याप एकाही सामन्यात परिपूर्ण सांघिक खेळ करता आलेला नाही. असे असूनही भारतीय संघाने उपांत्य फेरी गाठण्याची कामगिरी केली आहे. परंतु आता इंग्लंडला पराभूत करायचे झाल्यास भारताला सर्वच विभागांतील खेळ उंचवावा लागणार आहे.

अष्टपैलूंचा भरणा

दोन्ही संघांमध्ये दर्जेदार अष्टपैलू खेळाडूंचा भरणा आहे. एकीकडे भारताकडून हार्दिक पंड्या, शिवम दुबे आणि अक्षर पटेल, तर दुसरीकडे इंग्लंडकडून विल जॅक्स, सॅम करन आणि रेहान अहमद हे अष्टपैलू चमकदार कामगिरीसाठी सज्ज असतील. विशेष म्हणजे, हार्दिक आणि जॅक्स हे ‘आयपीएल’मध्ये मुंबई इंडियन्स संघाचे प्रतिनिधित्व करतात. हा संघ घरचे सामने वानखेडेवरच खेळतो. त्यामुळे हा अनुभव या दोघांसाठी महत्त्वाचा ठरू शकेल.

आतापर्यंतची वाटचाल

‘अव्वल आठ’ फेरीतील अखेरच्या सामन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध विजय अनिवार्य असताना संजू सॅमसनने नाबाद ९७ धावांची शानदार खेळी करत भारतासाठी निर्णायक भूमिका बजावली. आता अन्य फलंदाजांनीही अधिक योगदान देणे गरजेचे आहे. भारतीय संघाने ‘अव्वल आठ’ फेरीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध हार पत्करली. मात्र, साखळी फेरी आणि ‘अव्वल आठ’ फेरी मिळून भारताने अन्य सहा सामन्यांत विजय मिळवले आहेत. दुसरीकडे, इंग्लंड संघ साखळी फेरीत वानखेडेवर विंडीजकडून पराभूत झाला होता. परंतु त्यांनीही अन्य सहा सामने जिंकले आहेत. त्यामुळे आजचा सामना चुरशीचा होण्याची अपेक्षा बाळगली जात आहे.

वेळ : सायं. ७ वा.
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, २, १ हिंदी, जिओहॉटस्टार ॲप.

हार्दिककडून अपेक्षा

भारताला हार्दिक पंड्याकडून मोठ्या अपेक्षा असतील. महत्त्वाच्या सामन्यांत खेळ उंचावण्यासाठी हार्दिक ओळखला जातो. त्यातच वानखेडेवर त्याला चाहत्यांचा मोठा पाठिंबा लाभणेही अपेक्षित आहे. हार्दिकने मंगळवारी नेट्समध्ये कसून सराव केला. यावेळी तो चांगल्या लयीत दिसत होता. त्यामुळे आता तो दमदार कामगिरी करण्याचा निश्चित प्रयत्न करेल.

जॅक्सचे आव्हान

यंदाच्या स्पर्धेत सर्वाधिक चार वेळा सामनावीर ठरलेला विल जॅक्स याच्यापासून भारतीय संघाला सावध राहावे लागेल. जॅक्सने फलंदाजीत सात सामन्यांत १७७च्या स्ट्राइक रेटने १९१ धावा केल्या असून ऑफ-स्पिन गोलंदाजीने सात बळीही मिळवले आहेत. जॅक्सला वानखेडेवर खेळण्याचा अनुभवही आहे. त्यामुळेच त्याला रोखणे हे भारतासमोरील आव्हान असेल.

खेळपट्टीबाबत : वानखेडेच्या खेळपट्टीवर काहीअंशी गवत ठेवण्यात आले असून सुरुवातीच्या षटकांत वेगवान गोलंदाजांना मदत मिळण्याची शक्यता आहे. मात्र, खेळपट्टीवर स्थिरावल्यास फलंदाज फटकेबाजी करू शकतील. त्यामुळे मोठी धावसंख्या पाहायला मिळू शकेल.

तारांकित आमनेसामने

अर्शदीप वि. बटलर : इंग्लंडचा यष्टिरक्षक-फलंदाज जोस बटरलला (७ सामन्यांत ६२ धावा) यंदाच्या स्पर्धेत चमक दाखवता आलेली नाही. मात्र, बटलरने यापूर्वी वानखेडेवर चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे त्याला सुरुवातीलाच बाद करण्याचा भारताला प्रयत्न करावा लागेल. यासाठी डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगची भूमिका महत्त्वाची ठरू शकेल. वानखेडेवर पहिल्या काही षटकांत चेंडू स्विंग होतो. याचा फायदा करून घेण्यासाठी अर्शदीप प्रयत्नशील असेल.

बुमरा वि. ब्रूक : इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूकची विश्वातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये गणना केली जाते. यंदाच्या स्पर्धेत त्याने सात सामन्यांत २२८ धावा केल्या आहेत. यात पाकिस्तानविरुद्धच्या अप्रतिम शतकाचाही समावेश आहे. आता त्याला रोखण्यासाठी भारताला जसप्रीत बुमराचा अचूक वापर करावा लागेल. यंदाच्या स्पर्धेत बुमरा मधल्या षटकांत अधिक गोलंदाजी करत आहे. त्यामुळे आता बुमरा-ब्रूक द्वंद्व पाहण्यासारखे असेल.

आर्चर वि. सॅमसन : विंडीजविरुद्ध नाबाद ९७ धावांची खेळी केल्याने संजू सॅमसनचा आत्मविश्वास निश्चितपणे उंचावला असेल. परंतु उपांत्य लढतीत त्याला वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरच्या आव्हानाचा सामना करावा लागेल. गेल्या वर्षी इंग्लंड संघाने भारतात ट्वेन्टी-२० मालिका खेळली होती. त्यावेळी आर्चरने आखूड टप्प्याचे चेंडू टाकून सॅमसनला अडचणीत टाकले होते. सॅमसन जायबंदीही झाला होता. त्यामुळे त्याला यावेळी अधिक सावधपणे खेळावे लागेल.

जॅक्स वि. अभिषेक : भारताचे डावखुरे फलंदाज अभिषेक शर्मा आणि इशान किशन यांना ऑफ-स्पिन गोलंदाजांनी वारंवार अडचणीत टाकले आहे. त्यामुळे इंग्लंडचा संघही सुरुवातीलाच विल जॅक्सला गोलंदाजी देण्याची दाट शक्यता आहे. अभिषेकला अद्याप सूर गवसलेला नाही. मात्र, वानखेडेवर गेल्या वर्षी अभिषेकने इंग्लंडविरुद्ध अप्रतिम शतक केले होते. आता सुरुवातीला जॅक्सची षटके खेळून काढून नंतर धावगती वाढविण्याचा त्याला प्रयत्न करावा लागेल.

सलग तिसऱ्यांदा एकमेकांसमोर

ट्वेन्टी-२० विश्वचषकात सलग तिसऱ्यांदा भारत-इंग्लंड उपांत्य लढत होणार आहे. विशेष म्हणजे, गेल्या दोन पर्वांत या लढतीतील विजेत्याने पुढे जाऊन जेतेपद (२०२२ मध्ये इंग्लंड, २०२४ मध्ये भारत) पटकावले होते. त्यामुळे यंदाच्या लढतीकडेही क्रिकेटविश्वाचे लक्ष असेल.

२ : भारतीय संघ ट्वेन्टी-२० विश्वचषकात दुसऱ्यांदा वानखेडेवर उपांत्य लढत खेळणार आहे. यापूर्वी २०१६ मध्ये भारताची वेस्ट इंडिजशी गाठ पडली होती. त्यात भारताला पराभव पत्करावा लागला होता.