भारत ३६४ धावांत गारद; दुसऱ्या दिवसअखेर इंग्लंड ३ बाद ११९

पीटीआय, लंडन

अनुभवी जेम्स अँडरसनच्या (५/६२) भेदक गोलंदाजीपुढे भारताच्या तळाच्या फलंदाजांची तारांबळ उडाली. मात्र मोहम्मद सिराजसह (२/३४) अन्य गोलंदाजांनी टिचून मारा केल्यामुळे भारताने दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडला ३ बाद ११९ धावांपर्यंत रोखण्यात यश मिळवले आहे.

लॉर्ड्सवर खेळल्या जाणाऱ्या या कसोटीतील दुसऱ्या दिवसअखेर इंग्लंडचा संघ अद्याप २४५ धावांनी पिछाडीवर असून कर्णधार जो रूट ४८, तर जॉनी बेअरस्टो ६ धावांवर खेळत आहे. सिराजने डॉम सिब्ली (११) आणि हसीब हमीद (०) यांना सलग चेंडूवर बाद केले, तर मोहम्मद शमीने रॉरी बर्न्‍सचा (४९) अडथळा दूर केला.

तत्पूर्वी, गुरुवारच्या ३ बाद २७६ धावांवरून पुढे खेळताना भारताला सुरुवातीच्या दोन षटकांतच जबर धक्के बसले. शतकवीर के. एल. राहुल शुक्रवारी द्विशतकाच्या दिशेने कूच करेल, अशी आशा होती. परंतु ऑली रॉबिन्सनच्या दिवसातील दुसऱ्याच चेंडूवर चौकार लगावण्याच्या प्रयत्नात डॉम सिब्लीकडे झेल देऊन तो माघारी परतला. राहुलने १२ चौकार आणि एका षटकारासह १२९ धावा केल्या. पुढच्याच षटकात अँडरसनने उपकर्णधार अजिंक्य रहाणेला (१) तंबूचा रस्ता दाखवून भारताच्या धावगतीला लगाम लावला.

त्यानंतर ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा यांनी सहाव्या गडय़ासाठी ४९ धावांची भर घालून भारताला ३०० धावांचा पल्ला गाठून दिला. पंत (३७) फटकेबाजी करण्याच्या नादात माघारी परतल्यावर जडेजाने (४०) अखेपर्यंत खिंड लढवली. मात्र मोहम्मद शमी (०), जसप्रीत बुमरा (०) आणि इशांत शर्मा (८) या तळाच्या फलंदाजांनी निराशा केल्यामुळे भारताला ४००हून अधिक धावसंख्येपर्यंत मजल मारण्यात अपयश आले. भारताने ८८ धावांच्या मोबदल्यात अखेरचे सात बळी गमावले. इंग्लंडकडून अँडरसनने पाच, तर रॉबिन्सन आणि मार्क वूड यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवली.

संक्षिप्त धावफलक

’  भारत (पहिला डाव) : १२६.१ षटकांत सर्व बाद ३६४ (के. एल. राहुल १२९, रोहित शर्मा ८३; जेम्स अँडरसन ५/६२)

’  इंग्लंड (पहिला डाव) : ४५ षटकांत ३ बाद ११९ (जो रूट खेळत आहे ४८, रॉरी बर्न्‍स ४९; मोहम्मद सिराज २/३४)

भारत-इंग्लंड कसोटी मालिका

३१ जेम्स अँडरसनने कसोटी कारकीर्दीत ३१व्यांदा पाच बळी घेण्याची किमया साधली. त्याच्या एकंदर बळींची संख्या ६२६ झाली आहे.

७ ३९ वर्षीय अँडरसनने लॉर्ड्सवर सातव्यांदा पाच बळी मिळवले. २००३मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध पदार्पणातच त्याने पहिल्यांदा अशी कामगिरी केली होती.