Vaibhav Sooryavanshi Batting U19 World Cup final: वैभव सूर्यवंशीच्या वादळी खेळीच्या बळावर भारताच्या १९ वर्षांखालील संघाने विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात इंग्लंडवर १०० धावांनी विजय मिळवला. सहाव्यांदा अंडर-१९ संघाने जगज्जेते होण्याचा मान पटकावला. वैभव सूर्यवंशीने ८० चेंडूत १७५ धावा ठोकल्या. यात १५ षटकार आणि १५ चौकारांचा समावेश होता. वैभव सूर्यवंशीच्या या वादळी खेळीला कारणीभूत ठरला होता एक व्हॉट्सॲप मेसेज. याची माहिती समोर आली आहे.
बुधवारी उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताच्या अंडर १९ संघाने अफगाणिस्तान संघाचा पराभव केला. सामन्यानंतर वैभव सूर्यवंशीच्या व्हॉट्सॲपवर त्याचे पूर्वीचे प्रशिक्षक मनीष ओझा यांचा एक मेसेज आला. या मेसेजमध्ये त्यांनी लिहिले, “तू उत्तम फलंदाजी करत आहेत. पण या विश्वचषकात तुझे शतक झाले नाही. रणजी करंडक वगळता तू सर्वच स्पर्धांमध्ये एकतरी शतक केलेले आहेस.”
मनीष ओझा यांनी या मेसेजबद्दल इंडिया टुडेशी बोलत असताना माहिती दिली. ते म्हणाले, मी या मेसेजमधून त्याच्यावर कुठेही दबाव निर्माण होईल, असा प्रयत्न केला नाही. मी फक्त त्याला त्याच्या कुवतीची आणि त्याने भूतकाळात केलेल्या खेळीची आठवण करून दिली. माझ्या मेसेजनतर त्याने होय सर असा रिप्लाय दिला.
मनीष ओझा पुढे म्हणाले, मेसेज पाठविल्यानंतर मला वाटले की, मी कदाचित एका लहान खेळाडूनवर दबाव तर टाकत नाही ना. पण वैभव ज्या पद्धतीने त्याच्या खेळात परिपक्वता दाखवत आहे. त्यावरून मला वाटले की, तो हे व्यवस्थित समजून घेईल. त्याच्या रिप्लायनंतर मी त्याला दुसरा मेसेज पाठवला नाही.
सूर्यवंशीने आयपीएलच्या गत हंगामात शतकीय खेळी केल्यानंतर त्याच्याकडून आणखी धावा होण्यासाठीच्या अपेक्षा वाढल्या आहेत. ज्याप्रमाणे पूर्वी सचिन तेंडुलकरकडे पाहिले जात होते, त्याप्रमाणे क्रिकेट चाहते आता वैभव सूर्यवंशीकडे पाहत आहेत. अंडर-१९ विश्वचषकात वैभव सूर्यवंशीने आधीच्या सामन्यात २, ७२, ४०, ५२, ३० आणि ६८ अशा धावा केल्या होत्या. शुक्रवारी झालेल्या अंतिम सामन्यात मात्र त्याने आक्रमक पद्धतीने खेळत १७५ धावा केल्या.
अंतिम सामन्यात ४१२ धावांचे विशाल लक्ष्य
भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत असताना ४१२ धावांचे विशाल लक्ष्य इंग्लंडच्या संघासमोर ठेवले होते. वैभव सूर्यवंशीने सलामीला उतरत ३२ चेंडूत अर्धशतक झळकावले. यानंतर त्याने ५५ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. कर्णधार आयुष म्हात्रेने ५३ धावा करत वैभवला उत्तम साथ दिली. त्यानंतर अभिज्ञान कुंडू ४०, कनिष्क चौहान ३७ (नाबाद) यांच्या योगदानामुळे भारताची धावसंख्या ४११ वर पोहोचली.
इंग्लंडच्या संघानेही प्रत्युरात चांगली फटकेबाजी केली. मात्र त्यांना विकेट राखता आल्या नाहीत ४०.२ षटकात ३११ धावांवर इंग्लंडचा संघ सर्वबाद झाला. इंग्लंडकडून कॅलेब फॅल्कनरने ११५ आणि बेन डॉकिन्स ६६ धावा केल्या.
