भारत विरुद्ध इंग्लंड महिला क्रिकेट स्पर्धेतील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना खेळला जात आहे. पहिल्या सामन्यात इंग्लंडने विजय मिळवत मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि भारताला फलंदाजीचं आव्हान दिलं. भारताने २० षटकात ४ गडी गमवून इंग्लंडसमोर १४९ धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. शफाली वर्माने या सामन्यात चांगली खेळी केली.

पहिल्या विकेटसाठी शफाली वर्मा आणि स्मृती मानधना यांनी चांगली खेळी केली. पहिल्या विकेटसाठी त्यांनी ७० धावांची भागिदारी केली. मात्र फ्रेया डेविजच्या गोलंदाजीवर फटका मारताना मानधनाचा झेल मॅडी विलियर्सच्या हातात गेला आणि बाद झाली. तिने १६ चेंडूत ४८ धावा केल्या. त्यानंतर संघाची धावसंख्या ७२ असताना शफाली वर्मा बाद झाली. तिचं अर्धशतक अवघ्या दोन धावांनी हुकलं. तिने ३८ चेंडूत ४८ धावा केल्या. या खेळीत ८ चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. त्यानंतर हरमनप्रीत कौर आणि दिप्ती शर्मानं संघाची बाजू सावरली. मात्र संघाची धावसंख्या ११२ असताना हरमनप्रीत बाद झाली. तिने २५ चेंडूत ३१ धावा केल्या. यात २ चौकार आणि २ षटकारांचा समावेश आहे. त्यानंतर रिचा घोष आली आणि अवघ्या ८ धावा करून तंबूत परतली. २० षटकांचा खेळ संपला तेव्हा दीप्ती शर्मा नाबाद २४, तर स्नेह राणा नाबाद ८ या धावसंख्येवर होते.

आता भारतानं ठेवलेलं १४८ धावांचं आव्हान इंग्लंड पूर्ण करतं का? याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे.