Team India Playing XI Update: अफगाणिस्तानला कसोटी आणि वनडे मालिकेत धूळ चारल्यानंतर आता भारतीय संघ आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्धच्या आव्हानासाठी सज्ज झाला आहे. २६ जूनपासून भारत आणि आयर्लंड या दोन्ही संघांमध्ये होणाऱ्या २ टी-२० सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना २६ जूनला खेळवला जाणार आहे. या मालिकेचं मुख्य आकर्षण म्हणजे, १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला या मालिकेसाठी भारतीय संघात संधी देण्यात आली आहे. आयपीएल आणि भारतीय अ संघासाठी दमदार कामगिरी केल्यानंतर त्याला वरिष्ठ भारतीय संघात संधी देण्यात आली आहे. दरम्यान त्याला पहिल्या सामन्यात पदार्पणाची संधी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वैभवच्या पराभवानंतर कशी असेल भारतीय संघाची प्लेईंग ११? जाणून घ्या.

प्लेईंग ११ मध्ये कोणाला संधी मिळणार?

वैभव सूर्यवंशीला प्लेईंग ११ मध्ये संधी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. जर वैभव सूर्यवंशीला पदार्पण करण्याची संधी दिली गेली, तर भारतीय संघाच्या सलामी जोडीत बदल होऊ शकतो. जर वैभव आला तर अभिषेक शर्माचा पत्ता कट होऊ शकतो. कारण टी-२० वर्ल्डकप स्पर्धेदरम्यान तो ३ वेळा शून्यावर बाद झाला होता. तर संजू सॅमसन आणि इशान किशन या दोघांनी दमदार कामगिरी केली आहे.

पण जर वैभव आणि अभिषेक शर्मा या दोघांनाही संघात स्थान द्यायचं असेल, तर संजू सॅमसन तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसून येऊ शकतो. आता टीम मॅनेजमेंट काय निर्णय घेणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. वैभवला आयर्लंडसह इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या टी-२० मालिकेसाठीही भारतीय संघात स्थान देण्यात आलं आहे. जर आयर्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत तो चमकला, तर त्याला इंग्लंडविरुद्ध खेळण्याची संधी दिली जाऊ शकते.

पदार्पण करताच वैभव सूर्यवंशीच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद होणार आहे. वैभव हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा सर्वात युवा खेळाडू ठरू शकतो. वैभवने आयपीएल २०२६ स्पर्धेत धावांचा पाऊस पाडून ऑरेंज कॅपवर कब्जा केला. त्यानंतर भारतीय अ संघाकडून खेळताना त्याने श्रीलंका अ संघाविरुद्ध झालेल्या अंतिम सामन्यात अवघ्या ११ चेंडूत लिस्ट ए क्रिकेटच्या इतिहासातील वेगवान अर्धशतक पूर्ण केलं. त्यानंतर २९ चेंडूत ९४ धावांची खेळी केली. त्याच्याकडे सर्वात वेगवान शतक झळकावण्याची संधी होती. मात्र ही संधी थोडक्यात हुकली.