India vs Japan Historic T20I Match: BCCIने आढावा बैठकीत आश्वासन दिल्याप्रमाणे पहिल्या गोष्टीची अंमलबजावणी केली आहे. यासाठी बीसीसीआयने शुक्रवारी, ४ सप्टेंबर रोजी एक महत्त्वाची घोषणा केली. बीसीसीआयच्या माहितीनुसार, आशियाई क्रीडा स्पर्धेतील आपल्या मोहिमेची सुरुवात करण्यापूर्वी भारतीय पुरुष क्रिकेट संघ जपानविरुद्ध एक ऐतिहासिक टी-२० सामना खेळणार आहे.

आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताचा पहिला सामना २८ सप्टेंबर रोजी होणार असून, जपानविरुद्धचा सामना त्याआधी बरोबर सहा दिवस म्हणजेच २२ सप्टेंबर रोजी खेळवला जाईल. पुरुष क्रिकेटच्या इतिहासात भारत आणि जपानचे संघ आमनेसामने येण्याची ही पहिलीच वेळ असेल.

भारत आणि जपान यांच्यातील टी-२० आंतरराष्ट्रीय सामना २२ सप्टेंबर २०२६ रोजी खेळवला जाणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आणि जपान क्रिकेट असोसिएशनने शुक्रवारी संयुक्त निवेदनाद्वारे याची माहिती दिली. ‘सुजुकी कप’साठी होणारा हा सामना जपानमधील तोचिगी प्रांतातील सानो इंटरनॅशनल क्रिकेट ग्राउंडवर खेळवला जाणार असून, भारतीय वेळेनुसार सकाळी ९.३० वाजता सामना सुरू होईल.

दोन्ही क्रिकेट बोर्डांनी दिलेल्या माहितीनुसार, हा सामना ‘Sport 75’ या उपक्रमाची सुरुवात करणार आहे. भारत आणि जपान यांच्यातील क्रीडा क्षेत्रातील सहकार्य आणि लोकांमधील परस्पर संबंध वाढवण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. जपानचे पंतप्रधान साने ताकाइची आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात झालेल्या शिखर बैठकीत झालेल्या करारातून या उपक्रमाची कल्पना पुढे आली आहे.

भारताने २०३६चे ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक स्पर्धांचे यजमानपद मिळवण्याची इच्छा व्यक्त केली आहे, हे लक्षात घेऊन ‘Sport 75’च्या माध्यमातून भारत-जपानमधील क्रीडा क्षेत्रातील सहकार्य आणखी मजबूत करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

BCCIचे सचिव देवजीत सैकिया यांनी भारताचा क्रिकेट संघ जपानमध्ये जाऊन टी-२० सामना खेळणार असल्याबद्दल आनंद आणि अभिमान व्यक्त केला आहे. क्रिकेटला जपान आणि पूर्व आशियातील इतर भागांमध्ये लोकप्रिय करण्याची ही एक चांगली संधी असल्याचं त्यांनी म्हटलं. भारत आणि जपान यांच्यातील मैत्री अनेक वर्षांपासूनची आहे. त्यामुळे क्रिकेटच्या माध्यमातून या ७५ वर्षांच्या मैत्रीपूर्ण संबंधांचा उत्सव साजरा करणं हा एक खास अनुभव ठरणार असल्याचं सैकिया यांनी सांगितलं.