वृत्तसंस्था, कोलकाता

भारताचा सर्वकालीन सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटूंपैकी एक असलेला सुनील छेत्री आज, गुरुवारी आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील अखेरचा सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरेल, तेव्हा ‘फिफा’ विश्वचषक पात्रता फेरीत कुवेतविरुद्ध त्याला विजयी निरोप देण्याचा भारतीय संघाचा निर्धार असेल.

आपल्या १९ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत छेत्रीने भारतासाठी अनेक विक्रम प्रस्थापित केले. भारताकडून सर्वाधिक सामने (१५०), सर्वाधिक गोल (९४) असे महत्त्वपूर्ण विक्रम छेत्रीच्याच नावे आहेत. मात्र, त्याला कधीही विश्वचषक स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली नाही. आता कुवेतविरुद्ध आपल्या अखेरच्या सामन्यात निर्णायक भूमिका बजावत भारताला प्रथमच विश्वचषक पात्रतेच्या अंतिम १८ संघांच्या फेरीत स्थान मिळवून देण्याचा छेत्रीचा मानस असेल.

विश्वचषक पात्रतेत नऊ गटांतील अव्वल दोन संघ तिसऱ्या म्हणजेच अंतिम १८ संघांच्या फेरीत प्रवेश मिळवणार आहेत. या फेरीतून आठ संघ विश्वचषकासाठी पात्र ठरणार आहेत. भारताने कुवेतवर विजय मिळवल्यास त्यांचे तिसऱ्या फेरीतील स्थान जवळपास निश्चित होईल. भारतीय संघ २०२६च्या विश्वचषकासाठी पात्र ठरणे सध्या अवघड दिसत असले, तरी पात्रतेच्या तिसऱ्या फेरीत स्थान मिळवल्यास त्यांना आशियातील सर्वोत्तम संघांविरुद्ध किमान १० सामने खेळण्याची संधी मिळेल. यासह त्यांना अधिक मैत्रीपूर्ण सामनेही खेळता येतील. या दृष्टीने कुवेतविरुद्ध आज होणारा सामना भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

हेही वाचा >>>T20 WC 2024: रोहित शर्माच्या नावे वर्ल्ड रेकॉर्ड, ‘ही’ कामगिरी करणारा जगातील पहिलाच फलंदाज

भारतीय संघ सध्या चार सामन्यांत चार गुणांसह अ-गटात कतारनंतर (१२ गुण) दुसऱ्या स्थानावर आहे. अफगाणिस्तानचेही चार गुण असले, तरी सरस गोलफरकामुळे भारतीय संघ त्यांच्या पुढे आहे. कुवेतचा संघ तीन गुणांसह चौथ्या स्थानी आहे. आता कुवेतवर विजय मिळवल्यास भारतीय संघ दुसऱ्या स्थानासाठी आपली दावेदारी अधिक भक्कम करेल. अफगाणिस्तान आज कतारविरुद्ध सामना खेळणार आहे. या सामन्यात अफगाणिस्तान संघ पराभूत झाल्यास भारताचा पुढील फेरीतील प्रवेश निश्चित होऊ शकेल. या फेरीत मंगळवारी अखेरचे सामने होणार असून यावेळी भारताची कतार, तर अफगाणिस्तानची कुवेतशी गाठ पडेल.

केवळ माझ्यावर लक्ष नको…

छेत्री आपला अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळणार असल्याने कुवेतविरुद्ध त्याच्याच कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. याबाबत सामन्याच्या पूर्वसंध्येला छेत्री म्हणाला, ‘‘आम्ही सर्व खेळाडू २० दिवसांपूर्वीच एकत्र आलो आहोत. माझ्या अखेरच्या सामन्याविषयी आम्ही चर्चा केली. मात्र, आता हा विषय थांबणे आवश्यक आहे. केवळ माझ्यावर लक्ष केंद्रित करणे योग्य नाही. भारत विरुद्ध कुवेत या सामन्याविषयी, सर्वच खेळाडूंविषयी चर्चा करण्याची मी सर्वांनाच विनंती करतो. आम्ही हा सामना जिंकल्यास आम्हाला विश्वचषक पात्रता फेरीची तिसरी फेरी गाठण्याची संधी निर्माण होईल. त्याकडे सर्वांनी लक्ष केंद्रित केले पाहिजे.’’

● वेळ : सायं. ७ वा.

● थेट प्रक्षेपण : स्पोर्ट्स १८-१, जिओ सिनेमा